भर पावसात वरोराकरांनी अनुभवला गोविंदांचा थरार

38

वरोरा

स्वर्गीय विनायकराव वझे मेमोरियल ट्रस्ट, रोटरी क्लब, रोट्रॅक्ट आणि इनरव्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहीहंडी उत्सवाला भर पावसात नागरिकांनी हजेरी लावली.

श्रीकृष्ण जन्माष्टमी चे औचित्य साधून वरोरा शहरातील स्फूर्ती सपोर्टींग क्लबच्या मैदानावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर सागर वझे तसेच भाजपचे रमेश राजुरकर, माजी नगराध्यक्ष अहतेश्याम अली, डॉ अंकुश आगलावे, डॉ भगवान गायकवाड, बाबा भागडे, सुरेश महाजन, ओम प्रकाश मांडवकर, करण देवतळे तसेच रोटरीचे प्रांतपाल नितेश जयस्वाल आणि स्फूर्ती स्पोर्टिंग क्लबचे सचिव सुनील जवदंड उपस्थित होते.

वीस फूट उंच लावलेली दहीहंडी फोडण्याकरता गोविंदांची स्पर्धा लागली होती. हनुमान आखाड्याच्या गोविंदांनी ही दहीहंडी फोडत पंधरा हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि सन्मान चिन्ह मिळविले. याप्रसंगी बोलताना हरीश शर्मा यांनी मेरी माटी मेरा देश याकरिता सर्वांनी एकत्र येत राष्ट्रीय एकतेचे प्रतीक घडविणे गरजेचे असल्याचे सांगत दहीहंडी उत्सवाचे कौतुक केले. तसेच डॉक्टर सागर वझे यांनी स्वर्गीय विनायकराव वझे मेमोरियल ट्रस्ट तर्फे चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत शहरातील नागरिकांकरता यापुढे नवनवीन उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत मेरी माटी मेरा देश अंतर्गत गोळा करण्यात आलेल्या मातीचा कलेश दिल्ली येथे नेला जाणार असल्याचेही डॉ वझे यांनी सांगितले. याप्रसंगी सेवानिवृत्त सैनिक प्रवीण चिमूरकर आणि डी एन खापणे यांचा सत्कार करण्यात आला.
लहान मुलांकरीता आयोजित वेशभूषा स्पर्धेमध्ये राधा कृष्णाच्या आकर्षक वेशभूषेने प्रेक्षकांची मने जिंकली. यात लक्ष देवारकर, अनुप सोनेकर, केनीषा पटेल, स्वराली उंमरे आणि त्रियांश काळबांडे यांनी बक्षीसे जिंकली. इनरव्हीलच्या पदाधिकारी आभा सायरे, पूजा मुंदडा आणि कविता बाहेती यांनी परीक्षण केले तर वैशाली चाहारे व संध्या बारई यांची उपस्थिती याप्रसंगी होती. कार्यक्रमाचे संचालन शामल देशमुख नागपूर आणि सुरज धात्रक यांनी केले.