मुल शहरात दोन दुकानांना भीषण आग

28

लाखो रुपयाचे साहित्य आगीत स्वाहा

मुल : मुल शहरातील ताडाळा मार्गावर असलेल्या घरसंसार सेल व सायकल स्टोअर्सच्या दुकानाला अचानक आग लागली यात लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

.     प्राप्त माहिती नुसार मूल शहरातील ताडाळा मार्गावरील गणपती मंदिराजवळ मोहम्मद आमेर शेख यांच्या मालकीचे घरसंस्कार सेल आणि किशनलाल अरोरा यांचे श्री कृष्णा सायकल स्टोअर्स आहे. नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून दोन्ही दुकानाचे मालक आपल्या घरी निघून गेले. या दुकानांना लागूनच दुकानांची मोठी चाळ आहे. शेख यांच्या घरसंस्कार सेलमध्ये जीवनापयोगी घरगुती वस्तू स्टॉक करून ठेवल्या होत्या. किशनलाल अरोरा यांनीही श्री कृष्णा सायकल स्टोअर्समध्ये नुकताच बराच माल भरला होता. मध्यरात्री ३:३० च्या सुमारास दुकानांना अचानक आग लागली. आगीचा भडका उडाल्याने काहीं नागरिकांना हे दृश्य दिसले. त्यांनी लगेच फोन करून सावली येथील अग्निशमक दलालाही कळविण्यात आले. आगीची घटना कळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. दलाच्या जवानांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत घरसंसार सेलमधील लाखोंच्या वस्तू जळून खाक झाल्या. श्री कृष्णा सायकल स्टोअर्स मधील सायकल व दुचाकींचे ट्यूब, टायर, हवा भरायची मशीन आणि इतर सामान जळून खाक झाले. यात दोन्ही दुकानांत सुमारे ५ लाखांचे नुकसान झाले. पोलिसांनी शनिवारी सकाळी पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.