शिवणी ग्राम पंचायतचे उपसरपंच व १ सदस्य अपात्र

26

आणखी सदस्य अपात्र होण्याची शक्यता 

सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या मौजा शिवणी ग्राम पंचायत मधील उपसरपंच पांडुरंग रामदास बोरकर यांचेसह ग्राम पंचायत महिला सदस्या रंजना दिलीप बोरकर यांना  वेगवेगळ्या कारणाने नुकतेच अपात्र घोषित करण्यात आले असून ग्राम पंचायत मधील आणखी काही सदस्य अपात्र होण्याच्या मार्गावर असल्याची  खात्रीलायक माहिती प्राप्त झालेली आहे.

.      सिंदेवाही तालुक्यातील १३ किलोमिटर असलेले आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेले शिवणी गावाची लोकसंख्या अंदाजे ४  हजाराच्या वर असून या गावात ११ सदस्यीय ग्राम पंचायत कार्यरत आहे. इतर मागास प्रवर्गातील महिला करिता सरपंच पद राखीव असल्याने गावाची सरपंच म्हणून महिला कार्यरत आहेत. तसेच उपसरपंच म्हणून पांडुरंग रामदास बोरकर कार्यरत असताना त्यांनी गावातीलच शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून शासनाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावातील जागरूक नागरिक संतोष बोरकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे  तत्कालीन उपसरपंच पांडुरंग बोरकर यांनी शासनाच्या मौजा शिवणी येथील गट नंबर १३६ मधील ०.४० या सरकारी जागेवर अतिक्रमण केले असल्याची तक्रार दाखल करून तत्कालीन उपसरपंच पांडुरंग बोरकर यांना अपात्र करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने याबाबतची योग्य चौकशी करून महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६ व १४ (१) ( ज-३) या प्रमाणे उपसरपंच सह त्यांचे ग्राम पंचायत चे प्राथमिक सदस्य पदावरून सुद्धा अपात्र केले आहे. तसेच रंजना दिलीप बोरकर ही महिला सदस्य अपात्र झाली असून या सदस्याला ३ अपत्य असताना सुद्धा निवडणुकीचे नामनिर्देशन दाखल करताना शासनाला खोटी माहिती देऊन केवळ दोन सदस्य असल्याची खोटी माहिती पुरविली होती.

.      याबाबत विद्यमान सदस्य दामोधर रामटेके यांनी सदर महिला सदस्याची तक्रार करून  तीन अपत्य असल्याचे शासनाला अवगत करून दिले. त्यानुसार महिला सदस्यांची चौकशी करून तीन अपत्य असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५८ चे कलम नुसार रंजना दिलीप बोरकर या महिला सदस्याचे ग्राम पंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याने शिवणी येथील दोन ग्राम पंचायत सदस्य अपात्र झाले आहेत. तसेच उर्वरित ९ सदस्यांपैकी पुन्हा काही सदस्य मागील अनेक महिन्यांपासून ग्राम पंचायत चे मासिक सभेला सतत गैरहजर राहत असून रोजगाराच्या शोधात ते इतर जिल्ह्यात राहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमानुसार मासिक सभेला सतत गैरहजर असणारे सदस्य सुद्धा लवकरच अपात्र होतील अशी खात्रीलायक माहिती ग्राम पंचायत शिवणी अंतर्गत प्राप्त झाली आहे.