बल्लारपुरात घरफोडी : ८ लाखाचा ऐवज लंपास

15

अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

नातेवाईकांकडे गणपती दर्शनाला जाणे पडले महागात

बल्लारपूर : देश भरात गणेशोत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे. सणासुदीच्या दिवसात यानिमित्त नातेवाईकाकडे जाणे होते. हीच संधी साधून बल्लारपूर शहरातील अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ८ लाख रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी शहरातील किल्ला वार्डात उघडकीस आली. त्या कुंटुंबाला नातेवाईकांकडे गणपती दर्शनाला चांगलेच महागात पडले.

.        बल्लारपूर शहरातील किल्ला वार्डातील मालन श्रीहरी सातपुते या कुंटुंबाला घेऊन गोंडपिपरी तालुक्यातील करंजी या गावी नातेवाईकांकडे गणपती दर्शनाला गुरूवार (दि. १२) रोजी गेल्या. त्यांच्या घरी कोणीच नाही. ही संधी अज्ञात चोरट्यांनी हेरली. दरम्यान घराकडे लक्ष ठेव म्हणून त्यांनी नातु साई अनिल ढोंगे याचेवर जबाबदारी दिली होती. तो देखील घटनेच्या दिवशी घरा बाहेर निघून गेला. या संधीचा फायदा घेत, अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराचे कुलूप तोडून घरफोडी केली.

.        घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने, २५ तोळ्याचे चांदीचे दागिने आणि नगदी २ हजार रुपये असा एकूण ८ लाख १५ हजार रुपये किंमतीचा ऐवज लुटला. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीच्या मागावर असून घरफोडी करणाऱ्यांना लवकरच जेरबंद करणार, असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह करीत आहे.