येणाऱ्या सर्व निवडणुकांवर सिंगडझरी येथील नागरिकांचा बहिष्कार

13

सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या आणि अतीदुर्गम भागातील गट ग्राम पंचायत असलेल्या सिंगडझरी येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित झाले असून रोजगारावीणा नागरिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे सिंगडझरी ग्राम पंचायत अंतर्गत असलेले नागरिक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसह पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे नागरिकांनी प्रसिद्धी माध्यमांना कळविले आहे.

.       ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेल्या सिंगडझरी गट ग्राम पंचायत अंतर्गत पांढरवाणी, पिपरहेटी ही आदिवासी बहुल गावे येतात. गावात अनुसूचित जाती, जमाती, आणि इतर मागास प्रवर्गातील नागरिक वास्तव्याने राहतात. वरील प्रवर्गातील जास्तीतजास्त नागरिक हे भूमिहीन असून काही नागरिक अल्पभूधारक आहेत. त्यामुळे येथील नागरिक वन आधारित मजुरीवर आपला उदरनिर्वाह करीत असतात. यावर्षी पावसाच्या अतिवृष्टीमुळे पांढरवाणी येथील तलाव फुटल्याने या भागातील शेतीचे व रस्त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वनआधारित मजुरांचा बांबूचा व्यवसाय पूर्णतः मोडकळीस आलेला आहे. रोजगार नसल्याने कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. वन विभागांतर्गत सुरू असलेल्या कामावर स्थानिकांना डावलून मनमर्जी प्रमाणे कामे सुरू आहेत.

.       रमाई आवास शबरी आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मोदी आवास योजना, इत्यादी घरकुल योजनांपासून नागरिकाना वंचित ठेवण्यात आले आहे. गावातील नागरिक पाणी, रस्ते, आरोग्य या मूलभूत सुविधा पासून वंचित झाले असून शासन – प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने सिंगडझरी ग्राम पंचायत अंतर्गत येणारे नागरिक विधानसभा तसेच पुढील होणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचे माध्यमांना कळविले आहे.