विद्यार्थ्यांचा जीवनात ज्ञानगंगा रूजविणार्या शिक्षकांचा गुणगौरव

22

बल्लारपूर पंचायत समितीचे आयोजन

विसापूर जि.प.शाळेचे शिक्षक सन्मानित

विसापूर : आपल्या संस्कृतीत गुरू व शिष्याच्या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच नात्याला अनुसरून आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून बल्लारपूर पंचायत समितीच्या सभागृहात शिक्षकांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान म्हणजे विद्यार्थ्यांचा जीवनात ज्ञानगंगा रूजविणार्यांचा गुणगौरव सोहळा ठरला.

.     बल्लारपूर पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनजंय साळवे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी रविंद्र लामगे, कक्ष अधिकारी बाळकृष्ण चायकाटे, विसापूरचे केंद्र प्रमुख नागेंद्र कुमरे,सबतकौर भौंड यांची उपस्थिती होती.

.       यावेळी विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक दिनेश वरघने व सहायक शिक्षक शैलेश बरडे यांचा गटविकास अधिकारी धनजंय साळवे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल गुणगौरव करण्यात आला. धनजंय साळवे मार्गदर्शन करताना म्हणाले, शिक्षकांचे कार्य भावी पिढी घडविण्याचे आहे. त्यांचे योगदान समाजाच्या हितासाठी मोठे आहे. विद्यार्थ्यांत ज्ञानगंगा शिक्षकांमुळे रूजते. तेच देशाचे आधारस्तंभ घडवितात. ज्ञानगंगा प्रवाहीत करतात. गुरू व शिष्याच्या नात्याला ते जपतात. म्हणून त्यांचा गुणगौरव महत्वाचा आहे, असे गटविकास अधिकारी साळवे म्हणाले. प्रास्ताविक पंचायत समितीचे शिक्षणविस्तार अधिकारी रविंद्र लामगे यांनी केले. आभार सबतकौर भौंड यांनी मानले.