शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचा वरोऱ्यात भव्य मोर्चा

20

बैलबंडीसह शेतकरी पोहोचले तहसील कार्यालयात 

१५ दिवसांत मागण्या निवारणाचा इशारा

वरोरा : वरोरा शहर आणि तालुक्यातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि पुनर्वसन गावातील नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी माजी सभापती तथा काँग्रेस  प्रदेश उपाध्यक्ष शेख जैरुद्दीन उर्फ छोटूभाई कामगार कर्मचारी विभाग यांच्या नेतृत्वात वरोरा शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बैलबंडी घेऊन शेतकरी थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचले. दरम्यान तहसीलदार वरोरा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

.       मोर्चातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनासमोर आपले प्रश्न मांडले. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पळसगाव आणि रानतळोधी पुनर्वसन गावातील नागरिकांच्या समस्यांचा समावेश आहे. तसेच, अवैध उत्खननाविरुद्ध कठोर कारवाई, प्रलंबित कृषी पंप कनेक्शन पूर्ण करणे, अतिक्रमणधारकांना पट्टे देणे आणि वाढलेल्या विद्युत दरांमध्ये कपात करणे हे मुद्दे समाविष्ट आहेत. ” १५ दिवसांत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा शेख जैरुद्दीन उर्फ छोटूभाई यांनी प्रशासनाला दिला आहे.

.       डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चाला सुरवात झाली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. शेतकरी, शेतमजूर, अतिक्रमणधारक, अपंग, आणि निराधार प्रकल्पग्रस्तांनी मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, मोर्चाच्या आयोजनासाठी नागरिकांनी स्वतःच्या बैलबंडीसह सहभाग नोंदवला, ज्यात महिलांची व लहान मुलांची मोठी उपस्थिती होती.