लोनवाहीत धुमाकूळ घालणारा तो बिबट अखेर जेरबंद

130
  • १५ तासाच्या प्रयत्ना नंतर वनविभागाला आले यश
  • १४ शेळ्यावर मारला होता ताव 

सिंदेवाही :- वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या मौजा लोनवाही येथे मागील मंगळवारी आणि गुरुवारी या दोन दिवसांत एका बिबट्याने तब्बल १४ शेळया फस्त केल्या होत्या. त्यामुळे गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत सामाजिक युवा ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल निनावे यांनी आंदोलनाचा इशारा देताच वनविभागाने तात्काळ दखल घेत अवघ्या १५ ते २० तासात सदर बिबट्याला जेरबंद केले असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

.      सिंदेवाही नगर पंचायत मधील लोणवाही हा परिसर शहरालगत असून या परिसरात तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, या सारखे अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे कामाच्या निमित्ताने या परिसरात नागरिकांची नेहमी वर्दळ सुरू असते. या परिसराला लागूनच झुडपी जंगलं असल्याने जंगली प्राण्याची भीती सुद्धा नेहमी वाटत असते . दरम्यान मंगळवारी रवी ढोलने नामक व्यक्तीच्या गाभण असलेल्या ५ शेळ्या, आणि गुरुवारी महादेव कुंभरे यांच्या ९ शेळ्यावर बिबट्याने ताव मारला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी आलेल्या वन कर्मचाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना दमदाटी करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता.

.      त्यामुळे सामाजिक युवा ब्रिगेडचे अध्यक्ष अमोल निनावे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत वनविभागाला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन वन विभागाने बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू करून महादेव कुंभरे यांचे घराशेजारी पिंजरा लावला. व अवघ्या १५ ते २० तासात त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद केले. सदर कारवाही सींदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांचे नेतृत्वात सर्व वनरक्षक, वनमजूर, यांनी केली आहे.