चंद्रपुरात काँग्रेसचे चिखल फेको आंदोलन

41

सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चिखल फासले

चंद्रपूर : केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत. नीट परीक्षेतील घोळ, नेटचा पेपर फुट प्रकरण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी, गोरगरीब विरोधी धोरणाच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चिखल फासण्यात आले.

.        यावेळी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पाठवले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही औद्योगिक विकास पाहिजेतसा झालेले नाही. उलट बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप केला.

.        आमदार सुभाष धोटे यांनीही शासनावर कडाडून टीका केली. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत. या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते. निट परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्याथ्र्याचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे, असेही धोटे म्हणाले.

.        राज्यातील पोलीस भरती चिखलात सुरु आहे. यामुळे उमेदवारांचे नुकसान होत आहे. सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत सरकार चालढकल करत असल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. गुन्हेगारी मध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. महिला, मुलींचे दिवसाढवळया रस्त्यावर खून पाडले जात आहेत. राज्यातील शेतकरी भयंकर संकटात आहेत पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा,कापूस सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही, असा आरोप यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला.

.        यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजित वंजारी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, विनोद दत्तात्रेय, सुभाषसिंग गौर, के. के. सिंग, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम मुलचंदानी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन अनुसूचित जाती, महिला आघाडी, अल्पसंख्यांक आघाडी युवक काँग्रेस, कामगार आघाडी यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.