पावसाने दडी मारल्याने सिंदेवाहीतील शेतकरी हैराण

41

सिंदेवाही : जून महिना संपत आला असून शेतकऱ्यांनी शेतीचा पेरणीपूर्व हंगाम करून ठेवला आहे. मात्र मृग नक्षत्र पूर्णतः कोरडा जात असल्याने, आणि पावसाने दडी मारली असल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. तालुक्यात दमदार पावसाची नितांत गरज निर्माण झाली आहे.

.       सिंदेवाही तालुका हा पूर्णतः धानाच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यात शेतीच्या सिंचनासाठी एक लघु प्रकल्प, आठ मामा तलाव, तर अनेक बोळ्या, आणि शेतकऱ्यांचे खाजगी बोअरवेल्स उपलब्ध आहेत. बाकी शेती ही कोरडवाहू असल्याने निसर्गाच्या भरवशावर अवलंबून आहे. साधारणतः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडून शेतकऱ्यांना कामाला लावतो. मात्र यावर्षी जून महिना पूर्णतः कोरडा जात असून अंगाची लाही लाही करणारी उष्णता प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट बघत आपला शेतीचा पेरणीपूर्व हंगाम करून ठेवला आहे. मात्र एकामागून एक दिवस जात असताना पावसाने दडी मारली असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. ज्यांचे कडे सिंचनाची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची पेरणी करणे सुरू केल्याने इतर शेतकरी हैराण झाले आहेत. येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत आर्द्रा नक्षत्र सुरू होणार असून या नक्षत्राचा तरी भरपूर पाऊस येणार अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.