रेल्वे पुलाचे बांधकाम संथगतीने रेल्वे मार्गामुळे विभागले गाव

79

नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठी अडचण

वर्धा – बल्लारपूर चौथ्या रेल्वे मार्गाचे काम

विसापूर : नागपूर मध्य रेल्वे विभागांतर्गत वर्धा ते बल्लारपूर चौथ्या रेल्वे मार्गाचे काम केले जात आहे. या अनुषंगाने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे भूमिगत पुलाचे बांधकाम केले जात आहे. मात्र कामाच्या संथगतीमुळे नागरिकांना अडचणीला समोरे जावे लागत आहे. अगोदरच्या तीन रेल्वे मार्गाने विसापूर गाव विभागले आहे. भूमिगत रेल्वे पुलाच्या बांधकामामुळे ये – जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे गावाकऱ्यात असंतोष निर्माण झाला आहे.

.        बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठे गाव आहे. गावाची लोकसंख्या १७ हजारावर आहे. गावात गोंडवाना रेल्वे विसापूर हाल्ट स्थानक असून येथे गोंदिया – बल्लारपूर व वर्धा – बल्लारपूर पॅसेंजर रेल्वे गाडीचा थांबा आहे. गावाच्या मध्यभागातून पूर्वीच तीन रेल्वे मार्ग गेले आहे. यामुळे गावाची विभागणी दोन भागात झाली आहे. पूर्वी रेल्वेचे फाटक होते. तीन वर्षांपूर्वी ते रेल्वे फाटक बंद करून वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने भूमिगत मार्गाची निर्मिती केली.
याच भूमिगत मार्गाला जोडून चौथ्या रेल्वे मार्गांसाठी पुलाचे बांधकाम रेल्वे प्रशासनाने सुरु केले आहे. मात्र या बांधकामात संथगती असल्याने नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. मागील काळात रेल्वे प्रशासनाने भूमिगत मार्गाचे काम देखील निकृष्ठ दर्जाचे केले होते. परिणामी रस्त्यावरील लोखंडी सळाख बाहेर निघाल्या होत्या.यामुळे वाहन चालकांना धोका निर्माण झाला होता. रेल्वे पुलाच्या संथगतीच्या कामामुळे गावातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात मोठी अडचण निर्माण झाली असून पर्यायी मार्ग नसल्यामुळे अडथळा झाला आहे.

.        विसापूर येथील नागरिकांनी यासंदर्भात अनेकदा रेल्वे प्रशासनाला अवगत केले.मात्र नागरिकांच्या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने कानाडोळा केला आहे.तात्पुरती समजूत काढून असंतोष थांबविला. रेल्वे प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे नागरिक वैतागले असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी गावाकऱ्यांनी केली आहे.

लोखंडी पादचारी पूल निर्माण करा                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वात मोठे गाव आहे. विविध प्रकल्पामुळे हे जागतिक स्तरावर झळकले आहे. या गावाच्या माध्यभागातून पूर्वीच तीन रेल्वे मार्ग जोडले गेले आहेत. आता चौथ्या रेल्वे मार्गाचे काम केले जात आहे. रेल्वेच्या मार्गाने गावाची विभागणी झाली. भूमिगत मार्ग जरी आहे. मात्र भविष्यात ये – जा करणाऱ्यांना हा मार्ग उपयोगी ठरणार, याची शास्वति नाही. भूमिगत मार्ग वाहन चालकासाठी उपयुक्त आहे. मात्र पायी ये – जा करणाऱ्या नागरिकांसाठी पादचारी पुलाची नितांत गरज आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने विसापूर गावासाठी रेल्वे प्रशासनाने लोखंडी पादचारी पुलाची निर्मिती करावी. नागरिकांची ही आग्रही मागणी आहे.