सर्वसामान्यांच्या पाठीशी सदैव उभी राहणार

68

नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आश्वासन

मतदारांचे मानले आभार

वरोरा : मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने आपण मोठ्या फरकाने विजयी होऊ शकलो. यामुळे सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानते. सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण सदैव उभे राहू तसेच शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा विश्वास नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा येथे व्यक्त केला आहे. नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या स्वागत रॅलीचे आयोजन महाविकास आघाडीच्या वतीने बुधवार ५ जून रोजी वरोरा येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

.        वरोरा शहर व तालुका काँग्रेस कमिटी आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या स्वागत रॅलीचे आयोजन बुधवार ५ जून रोजी करण्यात आले होते. डॉक्टर जाजू हॉस्पिटल चौकातून ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या प्रचंड आतषबाजीत निघालेली स्वागत रॅली गांधी चौकात चौकात पोहोचल्यानंतर रॅलीचे स्वागत व आभार सभेत रूपांतर झाले.

.        याप्रसंगी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भारतीय मुस्लिम परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष जावेद पाशा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे, डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत खापणे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, गजानन मेश्राम, पुरुषोत्तम खिरटकर, अनिल झोटिंग, छोटू शेख, अॅड. प्रदीप बुराण, दिपाली माटे, ऐश्वर्या खामनकर, नीरज गोठी, प्रवीण मालू, प्रमोद मगरे, बाळू चिंचोलकर, विशाल बदखल, वसंत सिंह आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असून, परिसरात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असताना त्यावर आधारित उद्योग येथे नाही. त्यामुळे कापसावर आधारित टेक्स्टाईल इंडस्ट्रीजसह अन्य उद्योग चंद्रपूर जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी सांगितले.

.        मतदार हा कोणत्या पक्षाचा, जातीचा किंवा धर्माचा आहे हे आमदार म्हणून काम करताना आपण कधीही बघितले नाही आणि कुणाशीही भेदभाव केला नाही. खासदार म्हणून सुद्धा आपण अशाच प्रकारे काम करणार असल्याने मतदारांनी आपली कामे बिनधास्तपणे खासदार म्हणून माझ्याकडे आणावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास टिपले तर संचालन डॉ. प्रशांत खुळे यांनी केले.