धाडसी, लढवय्या नेता बाळूभाऊ धानोरकर

30

मागच्या वर्षी आजच्या तारखेची (30 मे) ‘ती’ पहाट माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनाचा थरकाप ऊडवणारी होती. बाळूभाऊ गेले…! ही बातमी अकल्पनीय, अविश्वसनीय वाटत होती. खरं तर भाऊंची प्रकृती आठवड्याभरापासून ठीक नव्हती. प्रकृती गंभीर आहे याची पुरेपूर कल्पना सर्वांनाच होती. पण आमचा लढवय्या भाऊ आजाराशी दोन हात करून सहीसलामत वरोऱ्याला परतेल याचीही खात्री होती. परंतु ‘त्या’ पहाटे अघटित घडले होते. अनेक आव्हाने, संकटे लिलया पेलणारा आमचा भाऊ आरोग्याच्या संकटाला मात्र मात देऊ शकला नव्हता. या अकल्पित घटनेला आज वर्ष पूर्ण झाल, बाळूभाऊ आपल्यात नाही असे आताही वाटत नाही. त्यांच्या जुण्या आठवणी आजही मनात घर करून आहेत.
एखाद्या हिंदी चित्रपटाच्या कथानकातील नायकाला साजेसा वाटावा असा भाऊंचा प्रवास…अचंबित करणारा एक राजकीय झंझावात कायमस्वरूपी थांबला.

2003 मध्ये राजकीय कारकीर्दीला सुरुवात करताना शिवसेनेच्या किसान सेलच्या उपजिल्हाप्रमुखापासून महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार असा बाळूभाऊ धानोरकर यांचा उत्तुंग चढता राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. सर्वसाधारण कुटुंबातील, घरात कोणताही राजकीय वारसा नसतांना केवळ वीस वर्षात राजकारण, समाजकारण व व्यवसायात त्यांनी घेतलेली उत्तुंग झेप भाऊंच्या यशस्वीतेची जणू पावतीच होती. विलक्षण लोकसंग्रह भाऊजवळ होता. सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्त्यांशी ते आपुलकीचे संबंध ठेवत. विकासकामे करताना त्यांनी पक्षीय भेदभाव कधीच बाळगला नाही.

माणसं ओळखण्याची कला जशी भाऊंमध्ये होती, तशी माणसं जोडण्याची कलाही त्यांच्याकडे होती. भाऊशी जुळलेला माणूस सहजासहजी भाऊंशी दूर जात नसे. लोकांमध्ये राहायला भाऊंना नेहमी आवडायचे. सामान्य लोकांमध्ये भाऊंबद्दल विशेष आकर्षण असायचे.भाऊंचा कलरफुल पेहराव, तो हसरा चेहरा, चेहऱ्यावरील तेज, रुबाबदारपणा आकर्षित करणाराच होता. युवकांच्या गळ्यातील तर जणू ताईतच ते होते. कुठल्याही राजकीय, सामाजिक वा कौटुंबिक कार्यक्रमात भाऊ दिसले तर भाऊं सोबतच्या सेल्फीसाठी गर्दी व्हायची. भाऊही कधी कोणास नाराज करताना दिसले नाही.
कार्यकर्त्यांवर जीव लावणारा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा बाळूभाऊ मी अगदी जवळून अनुभवला. विकासात्मक कामांबध्दल भाऊंना नेहमीच तळमळ असायची. जनतेच्या कामाप्रती त्यांचा असलेला उत्साह, पाठपुरावा वाखाणण्याजोगा होता. आपल्या क्षेत्रात उद्योगधंदे आले पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी त्यांची धडपड असायची. मतदारसंघात टेक्स्टाईल पार्क यावा यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. लोकसभेतही त्यांनी हा प्रश्न मांडला होता. परंतु त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले.कोरोना काळातील त्यांची कार्य मतदारसंघातील नागरिकांच्या सदैव स्मरणात राहील. जीवाची पर्वा न करता केवळ मास्क लावून कोविड रुग्णांच्या कक्षात सहजपणे फिरून त्यांची विचारपूस करणारे बहुदा ते पहिले लोकप्रतिनिधी असावे.

‘आक्रमक नेता’ अशी भाऊंची ओळख होती. प्रशासन, अधिकारीवर्गात तर त्यांचा प्रचंड दरारा होता. जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी सत्तेत असताना व नसतानांही आंदोलने केली होती. त्यांचा स्वभाव सहृदय असला तरी, वेळानुरूप ते कठोर व्हायचे. फायद्यासाठी त्यांनी स्वतःचा स्वभाव बदलविला नाही वा कधी तडजोडही केली नाही.कोण काय म्हणतो? याची तमा भाऊंनी कधी बाळगली नाही. भाऊ आपल्या मनाप्रमाणे जगला. राजकीय नफा-तोट्याचे गणित त्यांना कधी जमले नाही.

असा हा, जनतेशी घट्ट नाळ जोडलेला जिगरबाज, लढाऊ व तेवढाच दिलदार नेता ऐन उमेदीच्या काळात वयाच्या 48 व्यावर्षी काळाच्या पडद्याआड गेला. भाऊच्या या अकाली जाण्याने धानोरकर परिवारांची कधीही भरून न निघणारी हानी झाली. मतदारसंघाचे, काँग्रेस पक्षाचे,चाहत्यांचे,व माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचेही मोठे वैयक्तिक नुकसान झाले.भाऊंवर प्रेम करणारे, त्यांचा चाहता वर्ग किती मोठा होता याचा प्रत्यय त्यांच्या अंत्ययात्रेचे दिवशी दिसला.त्यांच्या अंत्ययात्रेला इतकी अलोट गर्दी जमली होती की, स्मशानभूमीत पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. खरंच भाऊ ‘राजा’सारखा जगला व राजासारखा आपल्यातुन निघून गेला. असा निडर,धाडसी व सामान्य जणात वावरणारा लढवय्या नेता आता पुन्हा होणे नाही.

रहने को सदा दहर में,
आता नही कोई
तुम जैसे गये, ऐसे भी,
जाता नहीं कोई…..

दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची आज प्रथम पुण्यतिथी. भाऊंना पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली.

    विलास टिपले
माजीअध्यक्ष, नगर परिषद वरोरा.