एक अधिकारी सब पे भारी ; पोलीस अधीक्षकांनी केली जिल्ह्यातील वाळूतस्करी बंद

124

वाळूमाफियांमध्ये दहशत

वाळूतस्करीत फक्त एक नव्हे असे अनेक सचिन

तस्करीच्या व्यवसायात उतरणारा तो पोलीस कर्मचारी कोण?

चंद्रपूर : एका प्रामाणिक अधिकाऱ्याने कुठलीही तडजोड न करता काम करण्याचे ठरवले तर काय कायापालट होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण सध्या चंद्रपूर जिल्ह्यात बघायला मिळत आहे. सुदर्शन मुमक्का यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील अवैध धंद्यांना पूर्णपणे चाप बसली आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे आजवर जिल्ह्यात सर्रासपणे चालू असलेली वाळूतस्करी बंद झाली आहे. वाळूतस्करी करताना कोणीही आढळला तरी कारवाई ही होणारच असा स्पष्ट आणि कडक संदेश या माध्यमातून मूमुक्का यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाळूतस्करी करणाऱ्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. आता यावर नेमका काय तोडगा काढायचा असा प्रश्न या रॅकेटसमोर उभा ठाकला आहे. मात्र मूमुक्का यांच्या धडाडीच्या कारवाईचे सामान्य लोकांकडून कौतुक केले जात आहे.

जिल्ह्यात वाळूचा खजिना आणि तस्करांची चांदी : चंद्रपूर जिल्हा हा खनिज संपत्तीचा खजिना समजला जातो. येथे नद्यांची संख्या देखील अधिक असून वाळूचे प्रमाण देखील खूप आहे. वर्धा, उमा, वैनगंगा, इरई, अंधारी, पैनगंगा ह्या नद्यांतुन अमाप वाळूचा उपसा केला जातो. मूल, सावली, ब्रम्हपुरी, माजरी, भद्रावती, वरोरा, चिमूर या ठिकाणी लाखो ब्रास रेतीची साठवणूक केली जाते. येथील वाळू ही बांधकामासाठी उत्तम दर्जाची समजली जाते, त्यामुळे येथील वाळूची सर्वत्र मोठी मागणी आहे. त्यामुळे या वाळूची तस्करी करणारे एक मोठे रॅकेट तयार झाले. सर्व नियमांची ऐसीतैशी करून वाळू तस्करीचे सर्व नियोजन करण्यात आले. दररोज कोट्यवधीची वाळूची तस्करी केली जाते.

राजकीय आशीर्वादाने भुरटे चोर झाले वाळूमाफिया : जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळूतस्करीला राजकीय वरदहस्त प्राप्त आहे. त्याशिवाय हे शक्य नाही. यात कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नाही. वाळुतस्करीत भुरट्या चोऱ्या करण्याऐवजी एखाद्या राजकीय पक्षाचे एखादे छोटेमोठे पद घ्यायचे. पुढाऱ्याचा आशीर्वाद घ्यायचा, त्यांच्या कार्यक्रमांना पैसे पुरवायचे हा सर्वात सोप्पा उपाय आहे. असे करत भुरटे चोर ते वाळूमाफिया असा प्रवास त्यांनी सहज पूर्ण केला आहे. आज हे माफिया कोट्याधीश झाले आहेत. आलिशान गाड्या आणि बंगले त्यांचे आहेत. आणि ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कमावली बक्कळ माया : एखादे रॅकेट चालविण्यासाठी जसा राजकीय वरदहस्त असण्याची गरज असते तसेच प्रशासकीय सहकार्याची देखील आवश्यकता असते. या रॅकेटमध्ये महसूल, पोलीस, आरटीओ, खनिकर्म या विभागातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय एकही वाहन वाळूतस्करी करू शकत नाही. कोणी नवखा या वाळूतस्करीत आला की त्यावर लगेच कारवाई केली जाते. जोवर टक्केवारी निश्चित होत नाही तोवर वाळुतस्करी करू दिली जात नाही. यात या सर्व विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी अमाप संपत्ती कमावली आहे. त्यांची चौकशी केल्यास थक्क करणारी त्यांची काळी माया समोर येऊ शकते. असे असले तरी काही प्रामाणिक अधिकाऱ्यांनी मात्र यावर चाप बसवण्याचा प्रयत्न केला. काहींनी वाळूतस्करांच्या नाकात दम केला. मात्र अशा अधिकाऱ्यांची लवकरच बदली करण्यात येते.

वाळूतस्करीत असे अनेक सचिन : आज 1 मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेने वाळू तस्करी करणारे तब्बल चार हायवा पकडले. अनेक वर्षांनंतर अशी मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक मूमुक्का यांच्या बेधडक भूमिकेमुळेच हे शक्य झाले. यात पाच आरोपींपैकी गडचांदूर येथील माजी नगर उपाध्यक्ष तसेच काँग्रेसचा युवा नेता सचिन भोयर याचा समावेश आहे. या परिसरात वाळूतस्करीसाठी सचिन भोयर हे नाव परिचित आहे. मात्र या वाळू तस्करीत केवळ एक सचिन नाही. राजकीय आशीर्वाद घेऊन वाळूमाफिया झालेले जिल्ह्यात अनेक सचिन आहेत. रात्री वाळूमाफिया आणि दिवसा राजकीय पुढारी अशी सोंग घेऊन हे लोक वावरतात. या वाळूमाफियांवर कारवाई झाली तरच खऱ्या अर्थाने वाळू तस्करीवर आळा घालता येणे शक्य होणार आहे.

वाळूतस्करीत सामील तो पोलीस कोण ? : 1 मार्च रोजी जी कारवाई करण्यात आली, याचे कनेक्शन एका पोलीस कर्मचाऱ्याशी संबंधित आहे. या वाळूतस्करीच्या रॅकेटला पाठबळ देणारा एक पोलीस कर्मचारी थेट या वाळूतस्करीत उतरला आहे. दुसऱ्याच्या नावाने हायवा घेऊन स्वतः वाळूतस्करीचे रॅकेट तो चालवत आहे, अशी खात्रीपूर्वक माहिती आहे. यात त्याने बक्कळ माया जमवली आहे. ज्यावर कारवाईची जबाबदारी आहे त्याच कर्मचाऱ्याकडून हा प्रकार सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची माहिती घेऊन अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरातून केली तर याचा सकारात्मक संदेश समाजात जाईल अशी आशा जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.