सिंगडझरी येथे हिवाळ्यामध्येच पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट

51

◾ मागील काही महिन्यांपासून नळ योजना ठप्प.

◾ ग्राम प्रशासन पूर्णतः अनभिज्ञ.

सिंदेवाही : गावात चांगले शिक्षण, आरोग्यसेवा, आणि स्वच्छ व मुबलक पाणी असावे. अशी प्रत्येक नागरिकांनी धारणा असते. मात्र सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत सिंगडझरी येथे चक्क हिवाळ्यामध्ये पाण्याची भीषण समस्या निर्माण झाल्याने नागरिक ग्राम प्रशासनावर रोष व्यक्त करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

.         पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत गट ग्राम पंचायत असलेल्या सिंगडझरी येथे पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत गावात नळ योजना आहे. सदर नळ योजना ही कंत्राटदार मार्फत चालविल्या जात आहे. पाण्याची पर्यायी व्यवस्था म्हणून गावात हातपंप असून त्यावर सौर ऊर्जेवरील मोटारपंप बसविला आहे. या दोन स्त्रोत्रांतर्गत गावात पाण्याची व्यवस्था करण्यात आली असली, तरी मागील अनेक महिन्यांपासून गावातील नळ योजना ठप्प पडली असून पर्यायी व्यवस्था असलेला सौरऊर्जा हातपंप वातावरणातील बदलामुळे चार्ज झाला नसल्याने गावात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.

.         याबाबत ग्राम पंचायत पदाधिकारी व प्रशासन अनभिज्ञ असल्याने गावकऱ्यांनी ग्राम पंचायतवर रोष व्यक्त केला आहे. ऐन हिवाळ्यात नागरिकांचा पाण्यासाठी हाहाकार सुरू असून येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण होणार आहे. या गंभीर समस्येकडे ग्राम पंचायतनी त्वरित लक्ष घालून पाण्याची समस्या दूर करावी. अशी मागणी प्रसिध्दी माध्यमातून करण्यात येत आहे.