वासाळा मक्ता ग्रामपंचायतची आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल

43

फळबाग लागवडीतुन प्रत्येक कुंटुब सक्षम

नागभीड

.          वनहक्क समितीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात रोहयो अंमलबजावणी यंत्रणा म्हणून पहिल्यांदाच प्राप्त झालेल्या वासाळा मक्ता ग्रामसभेच्या द्वारे फळबाग लागवड करून या गावच्या प्रत्येक कुटुंबाला आर्थिक प्राप्ती होत आहे. आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने या गावाने टाकलेले पाऊल हे अभिनंदनीय असून वनहक्क कायद्याची प्रभावी अमंलबजावणी करून शाश्वत उपजीविकेसाठी वासाळा मक्ता हे गाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नावारूपास येईल असा विश्वास जि.प. माजी सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती समारोहाचे औचित्य साधत व्यक्त केला.

.          सामुहिक वनहक्क समिती व ग्रामसभा, वासाळा मक्ता च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. सामुहिक वनहक्क समितीच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्ष लागवड क्षेत्रात व निसर्गरम्य वातावरणात संपन्न झालेल्या या जयंती समारोहाचे उद्घाटन वासाळा मेंढा गट ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग गायकवाड यांनी केले, तर अध्यक्ष स्थानी जि.प. चंद्रपूर चे माजी सदस्य संजय गजपुरे हे होते. याप्रसंगी अक्षय सेवा संस्था मेंडकीचे, सुधाकर महाडोळे, पोलीस पाटील दिलीप राऊत, उपसरपंच संदीप कन्नाके, ग्रामसभा महासंघाचे सचिव राजेश पारधी, सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भोजराज पेंदाम व सचिव रामप्रकाश राऊत, मिंडाळा चे माजी सरपंच  रत्नमाला कसारे, ग्रा.प.सदस्य विलास बोधेले, विजय लेनगुरे, सुरेखा कुंभरे, मिंडाळा ग्रा.प. चे तंटामुक्ती अध्यक्ष कसारे  यांची प्रमुख उपस्थिती होती.

.          सुरवातीला लेझीम पथकाने समारंभ स्थळी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सर्वच वक्त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. यावेळी गावातील काही विद्यार्थिनी व महिलांनी सुद्धा प्रथमच मंचावर येत मनोगत व्यक्त केले व महिलांच्या सक्षमीकरणाची चुणूक दाखवली . याप्रसंगी सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती मार्फत सुरु असलेल्या फळबाग लागवडीला नजीकच्या शेतातून पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल  रत्नमाला कसारे व विष्णु कसारे तसेच आशा राऊत व दिलीप राऊत या शेतकरी दाम्पत्याचा समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच गावातील नागरिकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी वनहक्क समितीची स्थापना करून उत्कृष्ठ काम करीत असल्याबद्दल समितीचे अध्यक्ष भोजराज पेंदाम व सचिव रामप्रकाश राऊत यांचा महिला ग्रामसंघा तर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला.

.          या कार्यक्रमाचे सूत्र संचालन भाग्यश्री ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन  सारिका राऊत यांनी केले. कार्यक्रमा नंतर उपस्थित पाहुण्यांसह समस्त गावकऱ्यांनी  सहभोजनाचा आस्वाद घेतला.