समाजाचे देणे आहोत, याचे शल्य पत्रकारांना बोचत राहीले पाहिजे : प्रा. सदानंद बोरकर

57

 प्रेस क्लब सिंदेवाही द्वारा आयोजित जीवन गौरव सोहळा 

सिंदेवाही 

.           पत्रकारितेच्या लेखणीत एवढी धार असते की, त्यासमोर तलवारीची धार बोथट होताना दिसून येते. समाजाच्या नैतिकतेची जबाबदारी पत्रकारांच्या लेखणीतून निर्माण होणे काळाची गरज आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. पत्रकारिता करीत असताना आपण समाजाचे देणे आहोत, याचे शल्य पत्रकारांना बोचत राहीले, तरच समाजातील जळणघळण मजबूत होईल. असे मत झाडीपट्टी नाट्य रंगभूमीचे लेखक, दिग्दर्शक, तथा ज्ञानेश चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सदानंद बोरकर यांनी व्यक्त केले. ते प्रेस क्लब सिंदेवाही द्वारा आयोजित गौरव सोहळा कार्यक्रमात बोलत होते.

.           संवेदनशील माणूस जेव्हा अस्वस्थ होतो, तेव्हा त्याला शब्दबद्ध करण्याचे काम वृत्तपत्र करीत असतो. त्यामुळे पत्रकारिता ही डोळस असावी, समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार करणारी असावी. कुणाचेही मन दुखावणारी नसावी. पत्रकारांनो पत्रकारितेमधून संवेदनशील समाजाची प्रामाणिक भिंत बना. असेही प्रा. सदानंद बोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून परखड मत व्यक्त केले. दरम्यान दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंतीचे औचित्य साधून प्रेस क्लब सिंदेवाही यांचे वतीने मंगळवारी सिंदेवाही येथील पंचायत समिती सभागृहात जीवन गौरव सोहळा आयोजित करण्यात आला.

.           यावेळी मार्गदर्शक म्हणून सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पानमंद, संवर्ग विकास अधिकारी अक्षय सूक्रे, पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण, नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमाकांत लोधे, तालुका कृषी अधिकारी अनिल महाले, ज्येष्ठ पत्रकार बाबुरावजी परसावार, सामाजिक कार्यकर्ते निक्कू भैसारे, डॉ. केशव शेंडे, आय सी आय सी आय चे नवीन कपूर, इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रा. सदानंद बोरकर, डॉ. मानकर, डॉ. सुरपाम, रमाकांत लोधे, विजय सोयाम, एकता नागदेवते, डिंपल रामटेके, गौरी पेल्लारवार, युनूस शेख, प्रा. नागलवाडे, अरविंद गोहने, करकाडे, गभणे, यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. तसेच गेली ४० वर्षे पत्रकारितेमध्ये घालविणारे ज्येष्ठ पत्रकार बाबुरावजी परसावार यांनी मागील सर्व बातम्या संग्रहित करून अल्बम तयार केले. त्या अल्बमचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे मार्गदर्शक दिलीप लोडल्लिवार, संचालन राकेश बोरकुंडवार, तर सुधाकर गजभिये यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.