लोकमान्य कन्या विद्यालयात “भाषा स्पंदन भारत वंदन” उपक्रम

36

वरोरा

.         राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 उद्दिष्टांना अनुसरून लोकमान्य कन्या विद्यालयात हॅपी क्लास प्रकल्प अंतर्गत भाषा स्पंदन भारत वंदन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित या उपक्रमात इयत्ता आठवी ते दहावीच्या एकूण नऊ तुकड्यांनी वर्गश: नऊ प्रादेशिक देशभक्तीपर गीतांचे सामूहिक सादरीकरण केले. यामध्ये पंजाबी, कश्मिरी, राजस्थानी, भोजपुरी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि असामी भाषेतील गीतांचा समावेश होता.

.         या उपक्रमाला लोकमान्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ.जयश्री शास्त्री अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी हॅपी क्लास द्वारा आयोजित या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. संगीताचे फायदे विशद करताना, विद्यार्थी दशेत एकाग्रता वाढण्यासाठी संगीत प्रभावी माध्यम ठरू शकते असे प्रतिपादन त्यांनी केले. शिक्षण आनंददायी करण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता धोपटे यांनी विद्यार्थिनींनी अल्पावधीत ही प्रादेशिक गीते मुखोदगत करून सामूहीकतेचा उत्तम अविष्कार प्रकट केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

.         भाषा स्पंदन भारत वंदन या उपक्रमाच्या माध्यमातून भाषिक सौंदर्याचा आस्वाद तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा भाव वृध्दींगत करण्याचा प्रयत्न केल्याची भावना प्रकल्प संयोजक राघवेंद्र अडोणी यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. या उपक्रमात एकूण 500 विद्यार्थिनींचा सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन वर्ग 10 अ ची मेघा वरपटकर व आभार प्रदर्शन वर्ग 10 ब ची जान्हवी बदखल हिने केले.