वेगळ्या विदर्भ राज्यासाठी गडचांदूर येथे रास्ता रोको 

28

ॲड. वामनराव चटप यांच्या आमरण उपोषणाला समर्थन

नांदाफाटा 

.           गडचांदूर येथे आज विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष तालुका कोरपण्याच्या वतीने माणिकगड चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर येथील संविधान चौकात 27 डिसेंबर पासुन विदर्भवादी नेते माजी आमदार वामनराव चटप यांचे आमरण उपोषण सुरु आहे. उपोषणाला समर्थन देण्याकरिता गडचांदूर येथे रास्ता रोको करण्यात आले .

.           यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी सभापती नीलकंठ कोरांगे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष ॲड.श्रीनिवास मुसळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बावणे, माजी सभापती रवी गोखरे,माजी सरपंच नरेश सातपुते,माजी उपसरपंच मोरेश्वर आस्वले, उपसरपंच अनिल कौरासे, नांदा ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप, गडचांदूर शहर अध्यक्ष पटकोटवार,मुमताज अली, माजी सरपंच सचिन बोंडे, शिवाजी बोडे खाजाभाई, कालिदास उरकुडे,बंडु राजुरकर,कैलास कोरांगे व सुनील आमने यांचे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन स्थळी गडचांदूर चे ठाणेदार रवींद्र शिंदे, उपनिरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त उपस्थित होता.

.           कोरपणा येथे रास्ता रोको आंदोलन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 27 डिसेंबर पासून संविधान चौक नागपूर येथे ॲड. वामनराव चटप यांचे आमरण उपोषण सुरू आहे. विदर्भाची मागणी जोर धरत असताना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने कोरपणा येथील बस स्थानक चौकात आज शेकडो कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष सुनील बावणे व अविनाश मुसळे यांनी दिली.