लोकशाही वाचविण्यासाठी “संविधान जागृतीची ” गरज : डॉ. राजपाल खोब्रागडे

42

      सरडपार येथे संविधान सन्मान दिन संपन्न     

सिंदेवाही 

.          लोकशाही ही एक सातत्याने चालणारी जिवंत प्रक्रिया आहे. धार्मिक संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा दहशतवाद हे भारतीय लोकशाही समोर सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे लोकशाही टिकविण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून संविधानाची जाणिव जागृती करणे काळाची गरज आहे. असे मत भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष डॉ.राजपाल खोब्रागडे यांनी सरडपार येथील आयोजित संविधान सन्मान दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.

.         २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला एक सक्षम असे संविधान लिहून अर्पण केले . त्या दिवसाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा सिंदेवाही अंतर्गत तालुक्यातील सरडपार येथे ७४ वा संविधान सन्मान दिन आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. खोब्रागडे पुढे म्हणाले की, संविधानाचा प्रसार आणि प्रचार करताना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्या हक्काचे प्रतिनिधी संसदेत पाठविणे गरजेचे आहे. तरच भारतीय संविधानाचा सन्मान दिन साजरा केल्याचे फलित साध्य होईल.

.          यावेळी तालुका उपाध्यक्ष अंबादास कोसे, तालुका सचिव कोमल गेडाम, सुरज खोब्रागडे, ग्राम पंचायत सरपंच उज्वला शिडाम, माजी श्रामनेर मुन्ना बारसागडे, प्रशांत गोंगले, मुखरु गेडाम, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण गेडाम, तर प्रशांत गोंगले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सरडपार येथील असंख्य पुरुष महिला उपस्थित होते.