दिवाळी गोड करणार, “आनंदाचा शिधा !

36

      सिंदेवाही तालुक्यात २५ हजार कुटुंबांना मिळणार आनंदाचा शिधा!     

सिंदेवाही

.           सण उत्सवाच्या दिवसात सर्वसामान्य नागरिकांना गोड धोड करून खाता यावे. आणि सणवार आनंदात साजरा करता यावा. याकरिता मागील वर्षी पासून सुरू केलेला आनंदाचा शिधा घराघरात पोहचविण्यासाठी सिंदेवाही तहसील कार्यालय मार्फत नुकताच तहसीलदार संदीप पानमंद यांचे हस्ते तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना शिधा वाटप करण्यात आला.

.           दिवाळीसाठी घराघरात लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळी, चिवडा, असे पदार्थ बनवले जातात. यासाठी या पदार्थात वापरण्यात येणारे जिन्नस राज्यशासनाकडून आनंदाचा शिधा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.यामध्ये साखर, तेल, पोहा, रवा, डाळ, मैदा, असे सहा प्रकारचे जिन्नस केवळ १०० रुपयांमध्ये देण्यात येत आहे. दरम्यान सिंदेवाही तालुक्यातील एकूण २५०८९ पात्र कुटुंबांना शिधा वाटप करण्यात आला. यामध्ये अंत्योदय मधील ८३९६ लाभार्थी, तर १६६९३ अन्न सुरक्षा प्राधान्यक्रम लाभार्थी यांना शिधा मिळणार आहे. त्यासाठी सिंदेवाही तहसील कार्यालय मार्फत तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना नुकताच २५०८९ आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात आली. दिवाळी पूर्वी सर्व पात्र लाभार्थीना संबधित दुकानातून शिधा मिळणार असल्याचे तहसीलदार संदीप पानमंद यांनी कळविले. यावेळी नायब तहसीलदार मंगेश तुमराम, पुरवठा निरीक्षक यादव, आणि स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.