जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
अनावश्यक प्रवास आणि दुपारची श्रमाची कामे टाळण्याचा सल्ला
हाय-रिस्क गटातील व्यक्तींची विशेष काळजी घेण्याचे निर्देश
चंद्रपूर : भारतीय हवामान विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यात २१ मे रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ तर २२ ते २४ मे पर्यंत काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा ‘यलो अलर्ट’ वर्तविण्यात आला आहे. या तीव्र उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना विशेष खबरदारी आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाने सविस्तर मार्गदर्शक सूचना (ॲडव्हायझरी) जारी केल्या आहेत
🚨 मुख्य प्रतिबंधात्मक उपाय (दुपारी १२ ते ४ विशेष काळजी)
तीव्र उन्हात, विशेषतः दुपारी १२.०० ते ०४.०० वाजेदरम्यान अत्यंत आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, शक्यतो दुपारच्या वेळेत शेतातील किंवा इतर कष्टाची व श्रमाची कामे करणे पूर्णपणे टाळावे, कामगारांना सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी मालकांनी व कंत्राटदारांनी योग्य त्या सूचना व सुविधा द्याव्यात, उन्हात बाहेर पडताना किंवा काम करताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी, पांढरा शेला किंवा दुपट्टा वापरावा. तसेच चेहरा व डोके ओल्या कापडाने झाकावे.
💧 आहार आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण (हायड्रेशन)
शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सवाय ठेवावी. प्रवास करताना किंवा कामाच्या ठिकाणी मुबलक पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लिंबूपाणी, ताक, लस्सी यांसारख्या द्रवपदार्थांचे सेवन करावे, दुपारच्या वेळेस मद्य (अल्कोहोल), चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड ड्रिंक्स) पिणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाणी वेगाने कमी होते, उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होत असल्याने शिळे अन्न खाणे पूर्णपणे टाळावे. तसेच पचनास जड असणारे उच्च प्रथिनयुक्त (High-Protein) अन्न खाणे टाळावे.
🏡 घर थंड ठेवणे आणि अंतर्गत उपाय
सूर्यप्रकाशापासून बचावासाठी घरातील पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा. दिवसा घर बंद ठेवावे आणि रात्री थंड हवेसाठी खिडक्या उघड्या ठेवाव्यात, घरामध्ये कुलर, पंखे किंवा वातानुकूलन (AC) यंत्रांचा योग्य व सुरक्षित वापर करावा, उन्हाळ्यात हलके, पातळ, सच्छिद्र आणि पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे सुती (कॉटन) व खादीचे कपडे वापरावेत.
👥 संवेदनशील गट आणि पाळीव प्राण्यांची काळजी
गरोदर महिला, वयोवृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती आणि लहान मुले यांची उष्णतेच्या काळात विशेष काळजी घ्यावी, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे किंवा इतर त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, पाळीव प्राणी व गुरेढोरे यांना थेट उन्हात बांधू नये. त्यांना सावलीत ठेवून पिण्यासाठी पुरेसे व स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.
🛑 आणीबाणीची परिस्थिती (उष्माघात)
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला उष्माघात (Heat Stroke) झाला असल्यास, त्याला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करावेत. नागरिकांनी वरील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात येत आहे.


