रामनगर पोलिसांची धडक कारवाई
वडगाव परिसरातील आंबेडकर सभागृहाजवळ छापा
अवैध साठवणूक करणाऱ्या एकास अटक
चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम राबवत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. वडगाव परिसरातील आंबेडकर सभागृहाजवळ करण्यात आलेल्या एका मोठ्या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ४८ हजार ९९२ रुपयांचा सुगंधित तंबाखू व इतर मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.
. रामनगर पोलीस स्टेशनचे पथक हद्दीत गस्तीवर असताना, वडगाव येथील आंबेडकर सभागृहाजवळ राहणारा अजय कुमार याने आपल्या राहत्या घरी विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने अजय कुमार याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी त्याच्या घरातून बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेला पानमसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सिगारेट असा एकूण ५ लाख ४८ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपी अजय कुमार याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोउपनि कृष्णा दराडे, पोलीस कर्मचारी आनंद खरात, रामप्रसाद नैताम, प्रकाश बल्की, शरद कुडे, जितेंद्र आकरे, मनीषा, संदीप, प्रकाश मडावी, सुरेश कोरवार, रवीकुमार, प्रफुल्ल आणि पंकज पोंदे यांनी केली.
चंद्रपुरात पोलिसांची कडक पाळत !
महाराष्ट्रात सुगंधित तंबाखू आणि गुटख्याचे उत्पादन, साठवणूक तसेच विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात याची बेकायदेशीर विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून ही धडक छापेमारी केली. पोलीस प्रशासनाच्या या कडक भूमिकेचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.


