Home सामाजिक बल्लारपूरमध्ये ५ मे रोजी ‘आरोग्य जनसंवाद सत्र’

बल्लारपूरमध्ये ५ मे रोजी ‘आरोग्य जनसंवाद सत्र’

8

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नागरिकांना मिळणार समस्या मांडण्याचे थेट व्यासपीठ

आरोग्य सेवांमधील तक्रारी आणि सूचना आता थेट प्रशासनापर्यंत

ग्रामीण रुग्णालयात दुपारी ३ वाजता आयोजनातून यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न

चंद्रपूर : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे येत्या ५ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजता “आरोग्य जनसंवाद सत्राचे” विशेष आयोजन करण्यात आले आहे.

.      या जनसंवाद सत्राचे मुख्य उद्दिष्ट शासकीय आरोग्य यंत्रणेतील उणिवा दूर करणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे थेट निवारण करणे हे आहे. या कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार स्वतः उपस्थित राहून जनतेशी संवाद साधणार आहेत.

थेट संवादातून तक्रारींचे निराकरण
अनेकदा सामान्य नागरिकांना शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे किंवा ग्रामीण रुग्णालयातील सेवांबाबत अनेक तक्रारी असतात, मात्र त्या योग्य स्तरापर्यंत पोहोचत नाहीत. या व्यासपीठामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या आरोग्यविषयक समस्या, तक्रारी आणि सूचना थेट प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसमोर मांडता येणार आहेत. यावेळी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून, प्राप्त तक्रारींवर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले जाणार आहेत.

निर्भीडपणे सहभागी होण्याचे आवाहन
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख करण्यासाठी आमदार मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील आहेत. “बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी या सत्रात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या समस्या, तक्रारी आणि अपेक्षा निर्भीडपणे मांडाव्यात, जेणेकरून त्यावर प्रभावी व तातडीने कार्यवाही करता येईल,” असे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

.         प्रशासन आणि जनता यांच्यातील हा थेट संवाद आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!