सिंदेवाही : शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता आता प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना ऍग्रीस्टॉक (फॉर्मर आयडी) करणे बंधनकारक असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या नागरी सुविधा केंद्रावर जावून नोंदणी करून आपला शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करून घेण्याचे आवाहन तहसीलदार संदीप पानमंद यांनी केले आहे.
. शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी एग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फॉर्मर आयडी) दिनांक १५ एप्रिल, २०२५ पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. याकरिता सिंदेवाही तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले असून तहसील कार्यालय सिंदेवाही येथे ऍग्रीस्टॅक योजनेंतर्गत नोंदणीमध्ये येणाऱ्या अडचणींचे निराकरण शेतकऱ्याकरिता स्वतंत्र मदत कक्ष निर्माण करण्यात आला आहे.
फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) का आवश्यक आहे ? ऍग्रीस्टॅक योजनेत नोंदणी केल्याने शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान सन्मान निधी आणि विविध सरकारी अनुदान योजनांचा लाभ सहज मिळू शकतो. या आयडीच्या मदतीने शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणिकरण (E-KYC) करण्याची गरज राहणार नाही. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू-संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे त्या अनुषंगाने उन्हाळी हंगामासाठी ई पिक पाहणी शेतकऱ्यांनी न चुकता करणे आवश्यक असल्याचे तहसीलदार संदीप पानमंद यांनी सांगितले आहे.