Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा येथे योग शिक्षकावर प्राणघातक हल्ला

वरोरा येथे योग शिक्षकावर प्राणघातक हल्ला

7

तीन अज्ञात तरुणांनी केली बेदम मारहाण

योग वर्गाला जात असताना कृष्ण नगरी परिसरात घटना

आरोपींनी चेहरा झाकून केला हल्ला

वरोरा : शहरातील कृष्ण नगरी परिसरात एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाला तीन अज्ञात तरुणांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विलास दशरथ हजारे असे जखमी शिक्षकाचे नाव असून, या हल्ल्यात त्यांच्या तोंडाला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, विलास हजारे हे पतंजली योग संस्थेचे निःशुल्क योग वर्ग घेतात. १ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५:१५ च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे पायी योग वर्गाकडे जात होते. कृष्ण नगरी बोर्डाजवळ हायवेवर आले असता, एका मोपेडवर बसलेल्या तीन संशयित तरुणांनी त्यांना पाहिले. या तिघांनीही तोंडाला कापड बांधले होते आणि लाल रंगाचे टी-शर्ट घातले होते.

.      हजारे हे आशीर्वाद लेआउटच्या बोर्डाजवळ पोहोचले असता, या तरुणांनी दुचाकी आडवी लावून त्यांचा रस्ता अडवला. “तू आम्हाला शिवीगाळ का केली ?” असा बनाव रचत त्यांनी शिक्षकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एका आरोपीने त्यांच्या तोंडावर जोरात ठोसा मारला, ज्यामुळे त्यांचे ओठ फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि डाव्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली. धक्कादायक बाब म्हणजे, मारहाण केल्यानंतर आरोपींनी शिक्षकांचे फोटोही काढले आणि तिथून पळ काढला.

पोलीस तक्रार दाखल
घटनेनंतर जखमी शिक्षक प्रचंड घाबरल्यामुळे त्यांनी तात्काळ तक्रार दिली नव्हती. मात्र, २ एप्रिल रोजी त्यांनी वरोरा पोलीस स्टेशन गाठून याप्रकरणी सविस्तर तक्रार नोंदवली. पोलिसांनी तीन अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

error: Content is protected !!