आ. सुधीर मुनगंटीवारांचा यांनी व्यक्त केला विश्वास
आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीला मिळेल प्रोत्साहन – आ. मुनगंटीवार
चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासाला वेग : शिक्षण, कौशल्य व उद्योग क्षेत्रात मोठी पावले
आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते अमृत संस्थेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
उद्योजकतेला चालना देण्याचा संदेश
चंद्रपूर : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित “अमृतपेठ थेट बाजारपेठ 2026” या लघुउद्योग, व्यवसाय व उद्योजकता महोत्सवामधून लघुउद्योजकांना नवे बळ मिळेल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. त्याचवेळी या महोत्सवातूनच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पपूर्तीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रकल्पाच्या माध्यमातून विकासाला वेग येत असून शिक्षण, कौशल्य, आरोग्य आणि उद्योग क्षेत्रातील वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे ग्वाही यावेळी आ. मुनगंटीवार यांनी दिली.
. माता कन्यका परमेश्वरी सभागृह, चंद्रपूर येथे या महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर संगीता खांडेकर, सुरज पेदूलवार, नागपूरचे विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित, उपविभागीय व्यवस्थापक विक्रम पांडे, अमरावतीचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे, वर्धा जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश खराटे, चंद्रपूर जिल्हा उपव्यवस्थापक आदित्य सेंगर, गडचिरोली जिल्हा उपव्यवस्थापक विजय चौधरी तसेच अमृत मित्र व सखी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
. आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या प्रदर्शनातून स्थानिक उद्योजकांना केवळ विक्रीची संधी नव्हे, तर त्यांच्या कौशल्याला ओळख मिळण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. “उद्योजकांनी उत्पादन व हस्तकला क्षेत्रात करत असलेले कार्य त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया ठरेल.” अमृत संस्थेने जिल्ह्यातील 1000 पेक्षा अधिक युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचा संकल्प केला असून, हा उपक्रम आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. “या उपक्रमासाठी मी पूर्ण शक्तीने पाठीशी उभा राहीन,” असा विश्वासही त्यांनी दिला.
. आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘चंद्रपूर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून या मातीशी माझे अतूट नाते असल्याचे सांगत त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या विविध प्रकल्पांचा उल्लेख केला. “माझा जिल्हा राज्यातच नव्हे तर देशातही गौरवाने ओळखला जावा, हा माझा ध्यास आहे.’ उद्योजकतेच्या प्रवासात मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि बाजारपेठ यांचा अभाव हा मोठा अडथळा ठरतो. अमृत संस्थेच्या माध्यमातून शासनाने ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. संविधानाने प्रत्येकाला व्यवसाय करण्याचा अधिकार दिला असून, या संधीचा लाभ घेऊन स्वावलंबी होण्याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी उपस्थितांना केले.
![]()
. “अंथरूण पाहून पाय पसरावे” ही मानसिकता बदलून “पाय पाहून अंथरूण तयार करावे” हा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यासाठी मोठे ध्येय ठेवून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्र मध्ये महाराष्ट्रातील नवे तर देशातील पहिले इंडियन नॉलेज सिस्टीम अभ्यासक्रम सुरू केला. देशामध्ये आपण जेही करतो ते नंबर एक करतो. या विद्यापीठांमध्ये बहिणी शिक्षण घेऊन पुढे रोजगारनिर्मिती करतील. येथे महिलांसाठी कौशल्याधारित ६२ प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, या माध्यमातून त्या स्वावलंबी होतील. यामुळे महिलांना यश मिळून त्या कोणत्याही मदतीशिवाय कुटुंबाची उपजीविका आणि उत्पन्न सक्षमपणे चालवू शकतील, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.
. बल्लारपुरात स्वर्गीय सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत आहे. या ठिकाणी सुद्धा मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वनमंत्री असताना वनअकादमी येथे हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षण सुरू केले.मुल येथे कृषी महाविद्यालय उभारण्यात येत आहे तसेच मुल पॉलिटेक्निकला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. 80 कोटी रुपये खर्च करून कृषी हाट निर्माण करण्यात येत असून प्रशिक्षणाला 15 कोटीचा हॉल पारंपारिक, तसेच खाद्य पदार्थासाठी फुडकोर्ट उभारण्यात येत आहे. पंजाब नॅशनल बँकेशी सामंजस्य करार (MoU) करून अजयपूर येथे १० एकर जागेवर शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. तसेच, पूर्वी रखडलेले बांबू रिसर्च सेंटरचे काम आता गतीने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. चंद्रपुरात दहा हजार तुळशीची झाडे टेकडीवर लावण्यात येणार आहे.चंद्रपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आधुनिक तंत्रज्ञानासाठी टाटा कंपनी सहकार्य करत आहे.
. चंद्रपुरात कॅन्सर हॉस्पिटल मेडिकल कॉलेज उभारण्यात आले असून पुढील शिक्षणासाठी एएनएम व बीडीएस कॉलेज देखील करण्यात येणार आहे. यासोबतच, मी पाहिलेले स्वप्न आता साकार होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे. ५ मार्च २०२४ रोजी ताडाळी येथे १० एकर जागेवर या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. जिल्ह्यात जंगलावर आधारित फर्निचर निर्मिती करून ते जागतिक स्तरावर पोहोचवण्याची क्षमता आहे. यासाठी ताडाळी मध्ये काष्ठ प्रक्रिया व सुविधा केंद्राच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच, सहकारी तत्त्वावर सहकारी संस्थेसाठी शिलाई मशीनसाठी ५ कोटी रुपयांचा निधी कंपनीच्या CSR अंतर्गत उद्योजकाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे येत्या काळात चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी मजबूत पाया ठरणार असल्याचे यावेळी आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले.
. “या प्रदर्शनात किती वस्तू विकल्या जातील हे महत्त्वाचे नाही, तर आपण किती ठोस उद्दिष्टे ठरवून त्यासाठी प्रभावीपणे कार्य करतो हे अधिक महत्त्वाचे आहे,” असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी उद्योजकांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहातील विविध उत्पादनांच्या विक्री स्टॉलला भेट देत पाहणी केली.कार्यक्रमाच्या शेवटी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते यशपाल काशिनाथ सिंह, मृणाल सुधाकर पांडे, संदीप ठाकूर व रोहन दुर्गवंश या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.


