स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
दोन आरोपींना अटक
१ लाख २५ हजारांचा ऐवज हस्तगत
चंद्रपूर : शहरात सातत्याने होणाऱ्या दुचाकी चोरी आणि घरफोडीच्या घटनांमुळे नागरिक धास्तावले होते. या गुन्ह्यांना लगाम घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शुक्रवारी मोठी कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. तनवीर कदीर बॅग (२६) आणि शिवम उर्फ कट्ट्या अनिल कुडकेलवार (२६), दोघेही रा. गंगाराम वॉर्ड, चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईमुळे शहरातील दोन महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुद्देमाल जप्त आणि गुन्ह्यांचा उलगडा
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी शहरातील चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये MH-34 AU-8490 क्रमांकाची स्प्लेंडर मोटारसायकल आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या अटकेमुळे चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन मोठ्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, यात अपराध क्रमांक ३९७/२६ अंतर्गत मोटारसायकल चोरी आणि अपराध क्रमांक ३९२/२६ अंतर्गत घरफोडीच्या गुन्ह्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अशी झाली यशस्वी कारवाई
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी ही कामगिरी फत्ते केली.


