एकाच महिन्यात चोरीच्या ४ मोठ्या घटना
ट्रॅक्टर बॅटरी सह शेतीचे अवजारे लंपास
शेतकरी हवालदिल : वरोरा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
चंद्रपूर : वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नंदोरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अस्मानी संकटाने आधीच पिचलेला शेतकरी आता या ‘सुलतानी’ चोरीच्या संकटामुळे पूर्णपणे कोलमडला आहे. विशेष म्हणजे, एकापाठोपाठ एक चोरीच्या घटना घडत असतानाही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे “पोलीस प्रशासनाचे चोरांवर लक्ष आहे की नाही ?” असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
एकाच रात्री दोन शेतकऱ्यांचे साहित्य लंपास
१ एप्रिल २०२६ रोजी प्रशांत लांबट यांच्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी अज्ञात चोरट्यानी लंपास केल्या. यापूर्वी २९ मार्चच्या मध्यरात्री चोरट्यांनी गुरुदेव रामकृष्ण हरणे यांच्या शेतातील बंड्याचे कुलूप फोडून ट्रॅक्टरचे सामान, सोलर प्लेट आणि फासा असे २५ हजारांचे साहित्य चोरले. त्याच रात्री त्यांचे चुलत बंधू आदित्य हरणे यांच्याही शेतातून १० ते १२ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले. या सर्व प्रकरणांत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, मात्र पोलिसांच्या सुस्त कारभारामुळे अद्याप एकही चोरटा गजाआड झालेला नाही.
केबल जाळून तांब्याची चोरी ; मोबाईलही सुरक्षित नाही
केवळ साहित्याची चोरीच नव्हे, तर तोडफोडीचे प्रकारही वाढले आहेत. २४ मार्च रोजी विजय मोंढे, प्रमोद चामाटे, सुधाकर चामटकर आणि सोनटक्के यांच्या शेतातील बोरवेलच्या केबलवर चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी हे केबल कापून काही अंतरावर नेऊन जाळले आणि त्यातील तांबे काढून नेले. तसेच 20 मार्च ला प्रताप भोयर यांचा मोबाईलही भररस्त्यातून चोरीला गेला होता. या सर्व घटनांची रीतसर तक्रार देऊनही पोलीस प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांना आरोपी गवसेना
नंदोरी परिसरात सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे वरोरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून साहित्य जमवतो आणि चोरटे ते सहज लंपास करतात. काही महिन्यापूर्वी नंदोरी बस स्थानकजवळ असलेले मेडिकल पहाटे 5 वाजतच्या सुमारास चोरट्यानी फोडत रक्कम लंपास केली होती मात्र अद्यापही वरोरा पोलिसांना आरोपी गवसले नाही. मग पोलीस करतात काय ?” असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. वाढत्या चोऱ्यांचा तातडीने बंदोबस्त करून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नंदोरी परिसरातील शेतकरी करत आहे.


