घरात शिरून बकरी फस्त, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
वनविभागाकडून घटनास्थळाचा पंचनामा
बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने चक्क लोकवस्तीत शिरून एका घराच्या आवारातील बकरी ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे सावट असून, वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
. विसापूर येथील नागराज चौकाजवळ राहणारे विठ्ठल तुराणकर यांच्या घरी हा प्रकार घडला. तुराणकर यांच्याकडे ३ ते ४ शेळ्या-बकऱ्या आहेत. गुरुवारी (दि. २) पहाटे ४ वाजेच्या सुमारास बिबट्याने आवारभिंत ओलांडून त्यांच्या घरात प्रवेश केला. जनावरांच्या ओरडण्याच्या आवाजाने घरातील लोक जागे झाले, मात्र तोपर्यंत बिबट्याने एका बकरीचा गळा आवळून तिला ठार केले होते.
. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक वर्षा पिपरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच, पीडित पशुपालकाला योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, ‘अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्याना’च्या लगत असलेल्या या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.


