चंद्रपूर व कोल्हापूर जिल्ह्यात महिलांच्या आरोग्य तपासणी मोहिमेस मिळणार गती
“माझे आरोग्य माझ्या हाती” अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आ. मुनगंटीवार यांच्या विनंतीनंतर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक
चंद्रपूर : महिलांच्या निरोगी आयुष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या “माझे आरोग्य माझ्या हाती” या अभियानाअंतर्गत चंद्रपूर व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) तत्वावर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयासाठी मंगळवार ( दि.२२) मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली.महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि संभाव्य आजारांचे लवकर निदान व्हावे, यासाठी ही मोहीम अत्यंत मोलाची ठरेल. या मोहिमेच्या जलद अंमलबजावणीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना पत्राद्वारे विनंती केली होती, त्यानंतर मंत्रालयात बैठक घेण्यात आली.
. बैठकीस आमदार सुधीर मुनगंटीवार, आरोग्य विभागाचे आयुक्त, आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, स्त्री व प्रसूती रोग तज्ञ डॉक्टर संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. सुनिता तांदूळवाडकर, प्रकल्प संयोजक डॉ. कल्पना गुलवाडे, माजी अध्यक्षा डॉ. कल्पना घाटे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ. मंगेश गुलवाडे आणि प्रा. डॉ. सुरेखा तायडे यांची उपस्थिती होती.
. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यात वैविध्यपूर्ण आरोग्य सुविधांची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनांवर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. FOGSI व चंद्रपूर जिल्हा आरोग्य विभागातर्फे सादरीकरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत चंद्रपूर व कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्रियांचे वजन, रक्तदाब, रक्तातील साखर (ब्लड शुगर) आणि हिमोग्लोबिन या 4 मूलभूत तपासण्याची मोहिम संपूर्ण स्वास्थ्य जन्म आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्याचा मानस आहे. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि स्त्री व प्रसूती रोग तज्ञ डॉक्टर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा उपक्रम ग्रामीण आणि नागरी भागातील महिलांसाठी आरोग्यदृष्टीने एक महत्वाचा मैलाचा दगड ठरेल. असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.