Ø कामगार विभागाचे आवाहन
चंद्रपूर : शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात उष्माघात कृती आराखडा राबविण्यात येत आहे. वातावरणातील उष्णतेमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो. त्यात काही लोकांचा बळी जातो. उन्हाळ्यात वाढत्या तापमानाची झळ ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात जास्त जाणवते व याच कालावधीत इमारत बांधकाम व त्याच्याशी निगडीत कामे केली जातात. उष्णतेच्या दुष्परिणामापासून वाचण्याकरीता कामगार व मालक वर्गाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.
काय करावे : बांधकामाच्या ठिकाणी पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करावी. कामगाराने दुपारी 12 ते 4.30 वाजेपर्यंत भरउन्हात काम करू नये /करण्यास सांगु नये, त्या दृष्टीने कामगारांच्या कामाच्या वेळेचे नियोजन करावे. पहाटेच्या वेळेस जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तहान लागलेली नसतांना जास्तीत जास्त पाणी प्यावे. तसेच अन्य वेळी गोडताक, पन्हे, कोकम सरबत प्यावे. जेवणामध्ये ताजे अन्न, तांदळाची भाकरी, भाताची पेज, पालेभाज्या खाव्यात. उन्हामध्ये डोक्यावर टोपी, गॉगल व ओल्या कपड्यानी डोके मान व चेहरा झाकला जाईल याची खबरदारी घ्यावी.
. प्रथमोपचार पेटीमध्ये ओआरएस पाऊच, जुलाब प्रतिरोधक औषधे मुबलक प्रमाणात राहिल, याची खबरदारी घ्यावी. गरोदर कामगार व आजारी कामगारांकडून कामे करून घेऊ नये. दुपारी 12 ते 4.30 या कालावधीत बांधकामाच्या आतील भागातील कामे करण्यात यावी.
काय करू नये : कामगारांना दुपारी 12 ते 4.30 या कालावधीत शारिरीक श्रमाची कामे करण्यास सांगु नये.
. चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये. शिळे अन्न व जंक फुड, तेलकट व तिखट पदार्थ तसेच आम्लवर्धक पदार्थ घेऊ नये.