भरधाव एसटी बसने तिघांना चिरडले

15

वरोरा-वणी ९३० राष्ट्रीय महामार्गावरील कुचना येथील घटना

अपघातानंतर चालक पसार

माजरी : भरधाव वेगात असलेल्या एसटी महामंडळाच्या बसने समोरून आलेल्या एका दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सांयकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कुचना येथील कावडी क्रॉसिंगजवळ घडली. देशराम अच्छेलाल वर्मा (२६) अभिमन्यू अशोककुमार भारती वय (२) प्रिन्स कुमार विनोद राम (१२) अशी मृतांची नावे आहे. अपघातानंतर एसटी बस चालक पसार झाला.

.      देशराज वर्मा हे दोन अल्पवयीन मुलांना होंडा ऍक्टिवा या दुचाकी वाहनावर बसवून कुचना येथे टिफिनचे डब्बे पोहोचवून परत येत होते. दरम्यान देशराज वर्मा सदर दुचाकी वाहनाने राष्ट्रीय महामार्ग ९३० वरील कावडी क्रॉसिंगवर रोड ओलांडत होता. तर एसटी बस क्रमांक (एमएच १४ बीटी ५०६४) ही वरोराकडून वणीकडे जात होती. कुचना वस्ती समोरील कावडीक्रासिंग जवळ भरधाव व निष्काळजी पणाने एसटी बसने समोरून आलेल्या स्कुटी होंडा एक्टिवा (क्र. एमएच ३४ सीई ९३४७) या दुचाकी वाहनाला जोराची धडक दिली. यात देशराज वर्मा व अल्पवयीन मुलगा अभिमन्यु भारती हे जागीच ठार झाले. तर इतर एक अल्पवयीन मुलगा प्रिंसकुमार भारती हा गंभीर जखमी झाला होता. प्रिंसकुमार याला उपचारासाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान प्रिंसकुमारची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रुग्णवहीकेतून घेवून जात असताना प्रिंसकुमारचा भद्रावतीजवळ वाटेतच मृत्यू झाला. याप्रकारणी मृतकाचे नातेवाईक विनोद पंचम राम यांच्या फिर्यादीवरून एसटी बस चालक चंदू बिरजा कुळेटी (४३) रा. चंदनवेली, जि. गडचिरोली याच्याविरुद्ध माजरी ठाण्यात अप. क्र. ८५/२०२४ कलम १०६ (१), २८१ भान्यासं. सहकलम १८४ मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

.      अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. आणि अपघातग्रस्त एसटी बसला पोलिसांनी ताब्यात घेतला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम व माजरीचे ठाणेदार अमितकुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनात माजरी पोलीस करीत आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.