बोकडडोह नदीवर  ” रपटा” तयार करून मार्ग सुरू करा

8

उपविभागीय अभियंता यांना गावकर्‍यांचे निवेदन

सिंदेवाही : सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिंदेवाही अंतर्गत रामाळा जवळील बोकडडोह नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू असून पुल तोडला असल्याने सिंदेवाही जाणारा मार्ग बंद झाला आहे. सध्या पाऊस कमी झाला असून सदर नदीवर रपटा तयार करून वळण मार्ग बनविण्यात यावे . अशी मागणी परिसरातील शिवणी, वासेरा, गडबोरी, उमरवाही, रामाळा, गावामधून सिंदेवाही सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय येथे केली आहे.

.        सिंदेवाही – रामाळा या मार्गावरील नदीवर असलेला पुल क्षतिग्रस्त झाला असल्याने त्या ठिकाणी मोठा पुलाचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पूर्वीचा पुल तोडला. आणि बाजूने रपटा तयार करून वळण मार्ग सुरू करून दिला. मात्र पावसाच्या पुरात रपटा वाहून गेल्याने विभागाने सदर मार्ग बंद करून २० किलोमिटर अंतरावरून वळण मार्ग सुरू केला. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सिंदेवाही या तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील शिवणी, सिरकाडा, वासेरा सिंगडझरी, पांढरवाणी, पिपरहेटी, गडबोरी, उमरवाही, रामाळा, वानेरी, येथील नागरिकांना कार्यालयीन कामकाज करण्यासाठी, शैक्षणिक कामासाठी, रोजगारासाठी, आरोग्यासाठी, बाजारासाठी सिंदेवाही या तालुक्याच्या ठिकाणी रोज ये जा करावी लागते. मात्र पावसाळ्यापूर्वी सदर मार्ग बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाने ये जा करण्यास नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

.        नुकताच पाऊस कमी झाला असून नदीला पाणी नाही. त्यामुळे नदीवर पाईप टाकून रपटा तयार करण्यात यावा. आणि मार्ग सुरू करून देण्यात यावा. अशी मागणी वासेरा ग्राम पंचायतचे सरपंच दिलीप मेश्राम यांनी सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता षट्टगोपणवार यांना निवेदन देऊन  केली आहे.