पोलीस पाटलासह तिघांवर प्राणघातक हल्ला 

10

सकमुर येथे गणेश विसर्जनाला गालबोट

गावात तणाव, दोघांना अटक : एक  फरार

पोलीस अधिक्षकांच्या मध्यस्थीने गावकरी शांत

कोठारी : गोंडपिपरी तालुक्यातील लाठी पोलीस स्टेशन अंतर्गत सकमूर गावात मंगळवार दि.१६ सप्टेंबर ला गणेश विसर्जनाच्या कार्यक्रमात झालेल्या वादामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. गावातील इरफान शेख याच्यावर अवैध दारू विक्रीचा आरोप आहे, आणि या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाने गंभीर हिंसक वळण घेतले. इरफान शेख व त्याच्या नातेवाईकांनी गावातील काही नागरिकांवर प्राणघातक हल्ला केला, ज्यात पोलीस पाटील व अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

.       गणेश विसर्जनादरम्यान इरफान शेख व त्याचे काही नातेवाईक कार्यक्रमात सहभागी झाले होते. याचवेळी, त्याच्या एका नातेवाईकाने सकमूर गावातील एका व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवून सिगारेट ओढली, ज्यामुळे त्या व्यक्तीने आपली नाराजी व्यक्त केली. “मी वयाने तुझ्यापेक्षा मोठा आहे, हे तुला शोभते का?”असे विचारल्यावर दोघांमध्ये वाद झाला. या छोट्या वादातून पुढे हिंसक घटना घडली.वाद विकोपाला गेल्यानंतर इरफान शेख व त्याच्या चार नातेवाईकांनी किरण एनगंटीवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान किरणला वाचवण्याचा प्रयत्न करणारे पोलीस पाटील तुळशीराम काळे, मोहन तांगडे आणि विभाकर शेरखे यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. यात पोलीस पाटील तुळशीराम काळे आणि मोहन तांगडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

.       घटनेची माहिती मिळताच संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना पकडण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यांनी सकमूर बस स्थानकावर इरफान शेखच्या दोन नातेवाईकांना पकडून मारहाण केली. या दरम्यान लाठी पोलीस गावात पोहचले. संशयीतांना ताब्यात घेतले व गाडीत बसविले. मात्र गावकरी गाडीसमोर गर्दी करून आरोपीस गावकऱ्यांच्या ताब्यात देण्याची मागणी करीत गोंधळ निर्माण केला. याच गोंधळात पोलीस वाहनावर हल्ला करीत खिडक्या फोडल्या आणि टायरची हवा सोडली. त्याचवेळी विजय खर्डीवार यांचा पाय पोलीस वाहनात अडकून त्यांना दुखापत झाली.

.       घटनेची गंभीरता पाहता वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती तणावपूर्णच राहिली. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असले तरी मुख्य आरोपी इरफान शेख अद्याप फरार आहे. त्याच्या अटकेसाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे. आरोपींवर ३०७, ३२३, ५०६ आणि ४२७ कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

.       पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे, मध्यरात्री नंतर पोलीस अधीक्षक मुंम्का सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी, आदी गावात गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शांत केले. गावातील शांतता टिकवण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल, दंगा नियंत्रण पथकाच्या दोन गाड्या तैनात करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी शांतता राखावी आणि कायद्याला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

.       गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर गावातील ही घटना स्थानिक स्तरावर दारू विक्रीसारख्या गैरप्रकारांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होत असल्याचे दाखवते. या प्रकारातील हिंसाचार आणि गावकऱ्यांची प्रतिक्रिया यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवैध दारू विक्रीसारख्या समस्यांना वेळीच न रोखल्यास सामाजिक स्थिरता धोक्यात येऊ शकते. पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे काही प्रमाणात गावातील तणाव कमी झाला आहे, परंतु मुख्य आरोपी इरफान शेख अद्याप फरार असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

  ” गावातील तणावपूर्ण परिस्थितीला गांभीर्याने लक्षात घेऊन आम्ही तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेला गंभीर धक्का बसला असून आम्ही आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. गावकऱ्यांचा शांततेत सहकार्य करण्याची विनंती असून, मुख्य आरोपी इरफान शेखच्या अटकेसाठी आम्ही विशेष शोध मोहीम राबवली आहे. कोणत्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.                                                                                                                                                                                                                                                                                                                                   युवराज सहारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलीस स्टेशन, लाठी