एक वर्षापासून वृद्ध कलावंताचे मानधन रखडले

15

कलावंतावर उपासमारीची वेळ

कलावंताचे सांस्कृतिक मंत्री ना. मुनगंटीवार यांना निवेदन

सिंदेवाही : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचनालय विभागाच्या वतीने ५० वर्षांवरील वृद्ध कलावंतांना दरमहा मानधन दिल्या जाते. मात्र सिंदेवाही तालुक्यातील काही कलावंताचे मानधन मागील वर्षभरापासून रखडल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आली असून तात्काळ मानधन देण्यात यावे. याकरिता राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.

.        कलाकार हे तरुण वयात वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी करीत असतात. मात्र जसे जसे त्यांचे वय वाढत जाते, तेव्हा त्यांचेकडून मनोरंजन करणे शक्य होत नाही. अशा कलाकारांना कोणताही भविष्य निधी नसल्यामुळे वृद्धापकाळात त्यांना आर्थिक दुर्बलतेचा सामना करावा लागतो. वृद्ध कलाकारांच्या या सगळ्या समस्याचा विचार करून राज्य सरकार द्वारे कलाकार मानधन योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना २०१४ पासून लागू झाली असून ५० वर्ष पेक्षा जास्त वय असलेल्या कलाकारांना ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुसार मागील अनेक वर्षापासून सिंदेवाही तालुक्यातील २७ ते २८ वृद्ध कलावंत या योजनेचा लाभ घेत आहेत.

.        सर्व कलावंतांना दरमहा मानधन मिळत असताना मागील १ वर्षापासून सुधाकर घरत, मुकुंदा नन्नावरे, सुरेश गायकवाड, एकनाथ चौके, सुनंदा चौके, उष्टू मेश्राम, रामदास गराटे, काशिनाथ बावणे, दिलीप मडावी, या नऊ लाभार्थ्यांचे वृद्ध कलावंताचे मानधन रखडले आहे. त्यामुळे त्यांचेवर उपासमारीची पाळी आली आहे. वृद्ध कलावंत हे मिळणाऱ्या मानधनावर आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असतात. मात्र सतत मिळणारे मानधन मागील १ वर्षापासून मिळणे बंद झाले असून कोणत्या कारणाने बंद झाले आहे. याबाबत काहीही माहिती नाही. याबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन देऊन रखडलेले मानधन तात्काळ देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.