नांदगाव (पोडे) येथील तरूणाची आत्महत्या

24

बल्लारपूर – सास्ती दरम्यान पुलावरून घेतली उडी 

व्यसनाधीनतेमुळे संपविले जीवन

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील तरूण सास्ती येथील वेकोलि मध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता. तो व्यसनाधीन होता. व्यसन वाढल्याने तो कर्जबाजारी झाला होता. कर्जबाजारीपणाने तो जर्जर झाला. हा त्रास असह्य झाल्यामुळे त्याने बल्लारपूर – सास्ती दरम्यान पुलावरून वर्धा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (दि. १0) सप्टेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजता घडली. आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे गणेश चंद्रय्या येगेवार (3८) रा. नांदगाव (पोडे) असे नाव आहे.

.       गणेश हा दररोज दुचाकीने सास्ती वेकोलित कर्तव्य बजावण्यास जात होता. १0 सप्टेंबर रोजी तो नांदगाव (पोडे) येथील घरून निघाला. मात्र, त्याच्या मनात वेगळाच विचार आला. बल्लारपूर – सास्ती दरम्यान वर्धा नदीच्या पुलावर तो आला. १२.30 वाजता दरम्यान त्याने घरी फोन करून मी आत्महत्या करत आहे, असा संदेश दिला. घरातील नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्याठिकाणी केवळ गणेश ची दुचाकी आढळून आली.

.       या घटनेची माहिती नातेवाईकांनी बल्लारपूर पोलीस ठाण्याला दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून गणेश चा शोध नदी पात्रात  बोटीच्या माध्यमातून घेतला. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नाही. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी, बुधवार (दि. ११) सप्टेंबर ला पुन्हा शोध मोहीम राबवली. त्यावेळी कळमना गावाजवळ वर्धा नदी पात्रात गणेश चे प्रेत आढळून आले. पोलिसांनी प्रेताचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. मृतक गणेश ला दारू पिण्याची व जुगार खेळण्याची लत लागली होती. यातून तो कर्जबाजारी झाला. यामुळे घरात नेहमी वाद घालायचा. कर्जबाजारीपणाच्या कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी, त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा अधिक तपास बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विक्की लोखंडे व पोलीस शिपाई वाकडे करीत आहे.