परिस्थितीचे भांडवल न करता विद्यार्थ्यांनो कष्ट करण्याची तयारी ठेवा – प्रा. दिलीप चौधरी

21

“आझाद का राजा” मंडळाचा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित

सिंदेवाही : आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कदाचित असे वाटू लागते की, आपल्याकडे पैसा नाही, परिस्थिती जास्त बळकट नाही, त्यामुळे आपण कोणत्याही स्पर्धेत टिकू शकत नाही. असे वाटणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी. यश तुमच्या पदरी नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही. असे उदबोधक मार्गदर्शन छात्राविर राजे संभाजी प्रशासकीय महाविद्यालय मोरवा येथील प्राध्यापक दिलीप चौधरी यांनी केले. ते वासेरा येथील आझाद का राजा गणेश मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

.       सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील आझाद का राजा गणेश मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून गुरुवारी मागासवर्गीय हायस्कूल येथील पटांगणात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल चौधरी, उदघाटक सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून छात्रविर राजे संभाजी प्रशासकीय महाविद्यालय मोरवा येथील प्राध्यापक डॉ. दिलीप चौधरी, तर प्रमुख पाहुणे म्हणून मागासवर्गीय हायस्कूल चे मुख्याध्यापक नामदेव तोंडफोडे, सीताबाई विद्यालयचे येरमे, सर्वोदय विद्यालयाचे राजेश कामडी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय कापकर, माजी अध्यक्ष राजू नंदनवार, ग्राम पंचायत सदस्य महेंद्र सूर्यवंशी, नागेश बंडीवार, सूनील घाटे मंचावर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.दिलीप चौधरी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविण्यासाठी एक धेय्य डोळ्यासमोर ठेवून ते गाठण्यासाठी परिश्रम करावे. शेतातील कष्टापेक्षा सावलीत बसून दहा तास अभ्यास करणे सोपे आहे. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे. असे यावेळी सांगितले.

.       याप्रसंगी धनंजय कनिष्ठ महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, मागासवर्गीय हायस्कूल येथील गुणवंत विद्यार्थी, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवोदय विद्यालय साठी पात्र झालेले विद्यार्थी असे एकूण सात विद्यार्थ्यांना रबर ट्री या प्रजातीचे एक वृक्ष, आणि ट्रॉफी देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश बंडीवार, सूत्र संचालन महेंद्र कोवले, तर पोलीस पाटील देवेंद्र तलांडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी शिवणी, गडबोरी, येथील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आझाद का राजा गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.