समाजाने मांत्रिकांकडे जाऊ नये – अनिल लोनबले

12

सिंदेवाही : आपल्या समाजात भोंदू-बाबांचे अमाप असे पीक वाढत आहे. आपण अशा भोंदू-बाबांच्या भुलथापांना बळी पडू नये. मंत्राने आजार बरे होत नसतात. त्यामुळे कोणीही मांत्रिकांकडे जाऊ नये; असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनबले यांनी केले. सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील आझाद का राजा गणेश मंडळाच्या वतीने आयोजित ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ जनजागृती कार्यक्रमात त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी मांत्रिकांद्वारे केल्या जाणाऱ्या चमत्कारामागील विज्ञान समजावून सांगितले.

.       या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत वासेराचे सरपंच दिलीप मेश्राम हे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच महेश बोरकर, अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रपूर जिल्हा सदस्य, रमेश शिडाम, सिंदेवाही तालुका संघटक, डेकेश्वर पर्वते, तालुका सचिव, मोरेश्वर गौरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सिंदेवाही तालुका संघटक डेकेश्वर पर्वते यांनी समितीची भूमिका विशद केली. तसेच तालुका सचिव मोरेश्वर गौरकर यांनी जादूटोणा विरोधी कायदा अनुसूचीतील १२ कलमांसह समजावून सांगितला.

.       या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ग्राम पंचायत वासेराचे सरपंच दिलीप मेश्राम यांनी आझाद का राजा गणेश मंडळ वासेरा यांच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलिस पाटील देवेंद्र तलांडे यांनी तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष कुंदन आहाके यांनी केले. आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव भूषण बोरकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील घाटे, आदित्य बोरकर, महेश सोयाम यांनी सहकार्य केले.