वर्षा कोडापे यांना शोधपत्रकारितेसाठी ‘लाडली मीडिया पुरस्कार’

18

‘चंद्रपूरातील प्रदुषण व हवामान बदलाचा जननक्षमतेवरील परिणाम’ अभ्यासाची राष्ट्रीय दखल

चंद्रपूर : पॉप्युलेशन फर्स्ट या संस्थेद्वारे व युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड यांच्या सहयोगाने देशपातळीवर पत्रकारितेतील लिंगानुभाव संवेदनशील वार्तांकनासाठी देण्यात येणारा प्रतिष्ठित ‘लाडली मीडिया पुरस्कार’ चंद्रपूर येथील पत्रकार वर्षा कोडापे यांना मिळाला आहे. ठाणे येथील पुरस्कार सोहळ्यात रेणुका शहाणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

.       यावेळी लाडली मिडीयाचे प्रमुख के.व्ही.श्रीधर, योगेश पवार उपस्थित होते. लिंगानुभाव संवेदनशील पत्रकारितेसाठी दिला जाणारा हा पुरस्कार वर्षा कोडापे यांना शोध पत्रकारिता या विभागांतर्गत देण्यात आला. वर्षा कोडापे या धाराशीव येथील महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या ‘बाईमाणूस’ या मिडीया रिसर्च फाउंडेशनच्या प्रतिनिधी आहेत. याद्वारे वंचित घटकातील प्रश्नांवर संशोधनात्मक वृत्तांकन करण्यात येते. यासाठी बाईमाणूसचे संपादक प्रशांत पवार यांनी त्यांना विशेष मार्गदर्शन केले.

.       चंद्रपूरातील खाणी व औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रदूषणामुळे व हवामान बदलामुळे पुरूषांमधील वांझपणात वाढ झाल्यासंबंधीचा विशेष ग्राउंड रिपोर्ट वर्षा कोडापे यांनी ‘बाईमाणूस’मध्ये केला. या रिपोर्टची दखल देशपातळीवर घेण्यात आली. चंद्रपुरातील विविध घटकांतील महिला, पुरूष, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर यांच्याशी संवाद साधून हवामान बदलाचा व औष्णिक विद्युत केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणाचा आरोग्यावर कसा विपरीत परिणाम होत आहे, यासंबंधीच्या प्रतिक्रिया या रिपोर्टमध्ये त्यांनी नमूद करुन त्यामागच्या कारणांचा शोध घेतला. अगदी कमी वयात मुलींना येणाऱ्या पाळीची समस्या, प्रदूषणकारी घटकांमुळे पुरूषांच्या जननक्षमतेवर होणारा परिणाम यासंबंधीचा विस्तृत आढावा या रिपोर्ट मधून घेण्यात आला आहे. याचीच दखल घेत, यावर्षीचा लाडली मीडिया पुरस्कार त्यांना मिळाला.

.       पॉप्युलेशन फर्स्ट या संस्थेद्वारे 2007 सालापासून हा पुरस्कार देशपातळीवर दिला जातो. लिंगानुभाव संवेदनशीलता संबंधी असणाऱ्या ‘प्रिंट व डिजिटल मीडिया’ तसेच रेडिओ वरील वार्तांकन यासाठी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराबद्दल वर्षा कोडापे यांचे बाईमाणूस मीडिया रिसर्च फाउंडेशनचे संचालक अंकुशराव कदम व डॉ. रेखा शेळके, तसेच माहिती व जनसंपर्क संचनालयाच्या वरिष्ठ संचालक अर्चना शंभरकर, प्राचार्य डॉ. जयश्री कापसे, अविनाश पोईनकर, सुरज पटके, ॠषिकेश मोरे व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.