अर्थसहाय्यकरीता शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे तात्काळ कागदपत्रे द्यावी

26

तालुका कृषी अधिकारी वरोरा यांचे आवाहन

वरोरा : सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजने अंतर्गत खरीप २०२३ मध्ये सोयाबीन व कापूस पिकाची ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रति पिकास दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत हेक्टरी ५००० रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. सदर योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या सर्व ग्रामपंचायतला लावण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व कृषि सहायक यांचेकडे सदर गावनिहाय याद्या उपलब्ध आहेत.

.         योजनेचा लाभ घेण्यासाठी यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक खातेदार असल्यास विहित नमुन्यातील संमतीपत्र कृषी सहायक यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. सामायिक खातेदारांच्या बाबतीत सामाईक क्षेत्रातील कोणत्याही एका खातेदारास अर्थसहाय्य वितरीत केले जाणार असून सदर शेतकऱ्याचे संमतीपत्र व इतर शेतकऱ्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र कृषी सहायक यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

.         वरोरा तालुक्यात कापूस पिकाचे १२८३० वैयक्तिक खातेदार व ६५३६ सामाईक खातेदार असे एकूण १९३६६ शेतकरी तसेच सोयाबीन पिकाचे १११९८ वैयक्तिक खातेदार व ५०३२ सामाईक खातेदार असे एकूण १६२३० शेतकरी याप्रमाणे सोयाबीन व कापूस दोन्ही पिकांचे मिळून एकूण ३५५९६ शेतकरी या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळण्यास पात्र आहेत. मात्र त्यापैकी २६६३९ शेतकऱ्यानी कागदपत्रे कृषि विभागाकडे जमा केलेली असून ८९५७ शेतकऱ्यांनी अजूनही कागदपत्रे कृषी सहायक यांच्याकडे सादर केलेले नाहीत. तरी अश्या शेतकऱ्यांनी त्यांचे संमतीपत्र व ना-हरकत प्रमाणपत्र लवकरात लवकर आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी सहायक यांच्याकडे सादर करावे असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. अन्यथा कागदपत्रे जमा न केल्यास सदर शेतकरी अर्थसहाय्य च्या लाभापासून वंचित राहणार आहेत.

तसेच खरीप हंगाम २०२३ मध्ये ई-पीक पाहणी केलेल्या व ७/१२ उताऱ्यावर कापूस/सोयाबीन पीक पेरा नोंद असलेल्या ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आलेली नाहीत अशा शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयास पुराव्यासह (नोंद असलेला ७/१२ ची प्रत) अर्ज करावेत.