चंद्रपूरात गजबजलेल्या वस्ती शिरला बिबट

30

नागरिकांनी साठेआठ तास अनुभवला थरार : बिबट्या जेरबंद

चंद्रपूर : ताडोबा जंगलातून भरकटलेला एक बिबट इरई नदी काठाने चक्क चंद्रपुरातील गजबजलेल्या बिनबा गेट परिसरातील वस्तीत शिरल्याने प्रचंड खळबळ उडाली. ही थरारक घटना गुरुवारी (दि. ५) पहाटे ५ वाजता उघडकीस आली. घरांची मोठी दाटीवाटी असलेल्या घटनास्थळी नागरिकांची तोबा गर्दी उसळल्याने वन कर्मचारी व पोलिसांचा फौजफाटा तैनात करावा लागला. पहाटे ५ वाजतापासून सुरू झालेले रेस्क्यू ऑपरेशन तब्बल साडेआठ तासांनी म्हणजे दुपारी १.३० वाजता यशस्वी झाले. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. पूर्ण वाढ झालेला हा बिबट (नर) सुरक्षित असून, चिचपल्ली येथील ट्रॉन्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

.       चंद्रपुरातील बिनबा गेट परिसरातील बजाज तंत्रनिकेतन विद्यालयासमोर रात्री ३.३० वाजेच्या सुमारास काही नागरिकांना बिबट दिसून आला. या घटनेने धास्तावलेल्या नागरिकांनी ही माहिती परिसरातील अन्य नागरिकांना सांगितली. दरम्यान, हा बिबट बजाज तंत्रनिकेतन जवळील मच्छी नाल्यापासून वळसा घेत डॉ. आंबेडकर चौकाकडे निघाला. मात्र, या मार्गावर कुत्री आढळल्याने बिबट्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. तोपर्यंत परिसरातील काही नागरिक जागे झाले. वाहनांचीही वर्दळ सुरू झाली. त्यामुळे डॉ. आंबेडकर चौकाकडे न जाता बिबट्याने परिसरातील बोबडे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडातील झुडपात उडी मारली. हा संपूर्ण थरार नागरिकांच्या डोळ्यांदेखत घडला. तोपर्यंत बिनबा गेट परिसरात बिबट शिरल्याची वार्ता शहरात पसरली. घटनास्थळावर तोबा गर्दी उसळली. काहींनी ही माहिती वनविभाग व पोलिसांना दिली. त्यानंतर उपवनसंरक्षक आदेश शेणगे, विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर, शहर ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पहाटे ५ वाजताच घटनास्थळावर फौजफाटा तैनात करण्यात आला. वनविभागाच्या विशेष पथकाने रेस्क्यू मोहीम सुरू केली.

.       बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी ट्रँग्युलायझिंग गनचा वापर करावा लागतो. मात्र, हा बिबट जिथे दडी मारला त्या ठिकाणी एक मोठा वृक्ष व सभोवती झुडूप आहे. बाजुला सुरक्षाभिंत व लागूनच वर्दळीचा रस्ता. थोडी चूक झाली की बिबट उडी मारून थेट रस्त्यावर येण्याचा धोका होता. तीनही बाजूंना मोठ्या इमारती असल्याने दडी मारलेला बिबट कॅमेऱ्याच्या नजरेत येत नव्हता. पथकातील एक्स्पर्टने झुडपात जाऊन डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु, नेम लागेना. परिणामी, वर्दळीच्या रस्त्यावर मनपाचे वाहन उभे करून त्यावर शिडी लावण्यात आली. मनोऱ्यावरून कॅमेऱ्याने बिबट्याचा वेध घेणे सुरू केले. विशेष पथकाने झुडपात शिरून वेध घेतला. तेव्हा कुठे दुपारी १:३० वाजता ट्रँग्युलायझिंग गनचा नेम लागला. बेशुद्ध झाल्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले.

रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या पथकाचा सत्कार                                                                                                                              चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरात बिबट शिरल्याची घटना समोर आली आहे. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवत, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी वेळोवेळी योग्य सूचना दिल्या. जवळपास पाच तास आमदार जोरगेवार घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या पथकाचा त्यांनी सत्कार केला.