तब्बल चार महिन्यानंतर हरवलेला बालकाला मिळाले आई वडील

7

आधारलिंकच्या सहाय्याने मानसिक दिव्यांग मुलाच्या घरचा शोध

तेलंगणा राज्यातील बालक बल्लारपुरात

चंद्रपूर : दोन महिन्यापूर्वी रेल्वे चाईल्ड लाईनला बल्लारशाह रेल्वे स्थानकावर एक मानसिक दिव्यांग असलेला बेघर बालक आढळून आला. सदर मुलगा असहाय असल्यामुळे तसेच आपले नाव व पत्ता बरोबर सांगत नसल्याने रेल्वेने पोलिस चौकी येथे बालक मिळाल्याची नोंद करत त्या बालकाला तात्पुरत्या स्वरुपात शासकीय मुलांचे निरीक्षण गृह /बाल गृह, चंद्रपूर येथे दाखल केले. त्यानंतर त्याचे आधार नोंदणी केली. त्या आधारे तो बालक तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील असल्याचे माहिती होताच तेथील पोलिसांच्या मदतीने हरवलेल्या त्या बालकाला त्याचे आई वडील मिळाले.

.       प्राप्त माहिती नुसार 1 जुलै 2024 रोजी रेल्वे चाईल्ड लाईनला एक मानसिक दिव्यांग असलेला बेघर बालक रेल्वे स्टेशन बल्हारशाह येथे आढळून आला. सदर मुलगा असहाय असल्यामुळे तसेच आपले नाव व पत्ता बरोबर सांगत नसल्याने रेल्वेने पोलिस चौकी येथे बालक मिळाल्याची नोंद करण्यात आली. सदर बालकास काळजी आणि संरक्षण अंतर्गत बालकल्याण समिती समोर सादर करण्यात आले. समितीने बालकाला तात्पुरत्या स्वरुपात शासकीय मुलांचे निरीक्षण गृह /बाल गृह, चंद्रपूर येथे दाखल केले. बालक आपला पत्ता बरोबर सांगत नसल्यामुळे पालकाचा शोध लावण्याची जबाबदारी बाल संरक्षण कक्ष अधिकारी व रेल्वे चाईल्ड हेल्पलाईनला दिली.

.       4 जुलै रोजी मुलाचा पत्ता शोधण्यासाठी तहसील आधार केंद्र, येथे नोंद केली. यावरून हरविलेला मुलगा रंगारेड्डी जिल्ह्यातील (तेलंगणा) असल्याची माहिती मिळाली. याआधारे जिल्हा बाल संरक्षण कक्षने रंगारेड्डी जिल्ह्याशी संपर्क साधला तर येथे पोलिस स्टेशनला मुलगा हरवल्याची नोंद आढळून आली. बल्लारशहा रेल्वे स्टेशनवर तुमचा मुलगा मिळाला आहे, ही बाब पोलिसांनी मुलाच्या घरी सांगितली. त्याच्या वडीलांनी रेल्वे चाईल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्याशी संपर्क केला आणि बालकल्याण समितीसमोर कागदपत्रे सादर केली. त्यांनी सांगितले की चार महिन्यांपासून मुलगा घरून निघून गेला होता. अखेर बाल संरक्षण समितीच्या सहाय्याने वडील आणि मुलाची भेट घडून आली.

.       या शोधकार्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, बल्लारपूरचे स्टेशन मास्टर रवींद्र नंदनवार, बाल निरीक्षण गृहाचे सल्लागार नीलेश जकुलवार, चाइल्ड हेल्प लाईनचे निरीक्षक सुनील पाठक, प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहुर्ले, भास्कर ठाकूर, त्रिवेणी हाडके, बबिता लोहकरे, धर्मेंद्र मेश्राम, सुरेंद्र धोडरे, विजय अमरथराज यांनी सहकार्य केले.

महिला व बालविकास विभागाचा 1098 क्रमांक ठरतोय मुलांसाठी वरदान                                                                                                                                                                                                                                                                                                                      हरविलेले मुले, घरातून पळून गेलेली मुले, भीक मागणारी मुले, बेघर मुले, बालकामगार, तस्करीचे बळी मुले, शोषणग्रस्त मुले, अपंग – अनाथ मुले, शाळाबाह्य मुले, विधीग्रस्त मुले, व्यसनी मुले, तसेच असाह्य मुला- मुलांकरिता मिशन वात्सल कार्यक्रमांतर्गत 24 तास कार्य करणारी सेवा ‘जिल्हा चाईल्ड हेल्पलाईन’ व रेल्वे स्टेशनवर लहान मुलांसाठी ‘राष्ट्रीय आपत्कालीन टोल फ्री हेल्पलाईन सेवा क्रमांक 1098’ कार्यान्वित आहे.