जिल्हाधिका-यांकडून अंमली पदार्थ नियंत्रण अंमलबजावणीचा आढावा

19

चंद्रपूर : जिल्ह्यात अंमली पदार्थ वाहतुक, साठवणूक आणि विक्री प्रतिबंध तसेच अंमली पदार्थ नियंत्रण अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नुकताच आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, शिक्षणाधिकारी निता ठाकरे, विजय कुमार नायर, निरंजन मंगरुळकर आदी उपस्थित होते.

.       यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालये इत्यादी शैक्षणिक संस्थेमध्ये अंमली पदार्थाचे सेवन होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी मॅराथॉन, रॅली, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पथनाटय आदी उपक्रम राबविण्याबाबत नियोजन करून तालुकानिहाय शाळा/ महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ विरोधी कार्यक्रम राबविण्यात यावेत. जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच जे कारखाने बंद आहेत त्यांची तपासणी करून पोलिसांच्या सहकार्याने वेळोवेळी विशेष लक्ष देऊन कारवाई करावी. अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर्सची अचानकपणे तपासणी करून सी.सी. टिव्ही लावण्यात आले आहे किंवा कसे ? ड्रग्जची विक्री याबाबत शहनिशा करावी.

.       जिल्हयात खसखस किंवा गांजा पिकाची लागवड होणार नाही, याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी.  टपाल विभागाने टपालद्वारे येणा-या  पार्सलमध्ये काही अंमली पदार्थाबाबत संशय आढळुन आल्यास तात्काळ पोलीस विभागांस माहिती द्यावी. तेलंगाना राज्य व चंद्रपूर जिल्हा यांच्या सिमेवर असलेल्या जंगलात अवैधरित्या अंमली पदार्थाची लागवड होणार नाही, याकरिता वेळोवेळी वन विभागामार्फत पेट्रोलिंग करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी गौडा यांनी दिल्या.