पालकमंत्र्यांच्या पत्रानंतर शेतकऱ्यांना ई-केवायसी करिता 15ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

21

Ø मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी घेतली दखल

Ø नुकसान भरपाई मिळण्यासाठी निर्माण झाली होती अडचण

चंद्रपूर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रानंतर काही तासांमध्ये मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी निर्णय घेतला. तात्काळ दखल घेऊन राज्यभरातील शेतकऱ्यांना ई-केवायसीकरिता 15 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

.       पालकमंत्री मुनगंटीवार यांना काही शेतक-यांकडून निवेदन प्राप्त होताच त्यांनी मंत्र्यांना पत्र लिहिले. सन 2023-24 मधील अतिवृष्टी व पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पीक वाहून गेले. संपूर्ण शेत पाण्याखाली आले. अशा परिस्थितीत नुकसान भरपाईसाठी पात्र असतानाही अडचण निर्माण झाली होती. नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे आणि अपुऱ्या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे अवघड आहे, अशाप्रकारचे निवेदन अनेक शेतकऱ्यांकडून मुनगंटीवार यांच्या कार्यालयात प्राप्त झाले होते.

.       या सर्व निवेदनांची दखल घेऊन पालकमंत्री मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांकडे वेळ अपुरा असल्यामुळे ई-केवायसीकरिता मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. आपण या प्रक्रियेकरिता मुदतवाढ द्यावी, असे पत्र  मुनगंटीवार यांनी मुदत व पुनर्वसन मंत्र्यांना लिहिले होते. या पत्राची काही तासांतच दखल घेण्यात आली आणि ई-केवायसीकरिता 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या तत्परतेमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात येणारी मोठी अडचण दूर झाली आहे.