अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची तातडीने दुरुस्ती करावी : संजय गजपुरे

45

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले निवेदन

नागभीड : नागभीड तालुक्यात मागील पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जि.प.चंद्रपूर चे माजी सदस्य संजय गजपुरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देत केली आहे.

.       मागील पंधरवड्यात संपूर्ण जिल्ह्यासह नागभीड तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून यामुळे तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचे नुकसान झालेले आहे. यात तालुक्यातील वलनी, नवानगर (तळोधी), लखमापूर, सोनुली बु., शिवनगर (नागभीड), सावरला, झाडबोरी (गिरगाव), धामणगाव चक, खरबी, पाहार्णी, जनकापूर, चिंधीमाल, खडकी (हुमा), घोडाझरी, किटाळी (बोर), व चिंधीचक या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतींचा समावेश आहे.

.       यातील बहुतांश शाळांचे छत गळत आहेत. सोबतच काही शाळांच्या भिंतीतून पाणी आत येत आहे, तर काही शाळांच्या भिंतींना भेगा पडल्या असून भिंतींना ओलावा सुद्धा आलेला आहे. अनेक शाळांच्या दारे व खिडक्यांचेही नुकसान झालेले आहे. यामुळे काही शाळांमधील शालेय पोषण आहाराचा साठा खराब झालेला आहे.

.       यामुळे अनेक वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य परिस्थिती नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सोबतच काही शाळांमधील शौचालय, किचन शेड व मुत्री घरांचेही या पावसामुळे नुकसान झालेले आहे. तरी अश्या वर्गखोल्या, शौचालय, किचन शेड व मुत्रीघरांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक व गरजेचे असल्याने यासाठी तातडीने बाधीत शाळांच्या नुकसानीचे तपशीलवार अहवाल मागवून, दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संजय गजपुरे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया व जि.प. प्रशासनाला केली आहे.