विसापूरच्या जि. प. हायस्कूल मध्ये विद्यार्थी १७५, पण शिक्षक दोनच !

24

शिक्षकांची मंजूर पदापैकी ६ रिक्त

सार्वजनिक शिक्षण क्षेत्रातील वास्तव

विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या विसापूर मध्ये जिल्हा परिषद हायस्कूल आहे.या शाळेत वर्ग ५ ते १0 पर्यंत विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहे. शाळेत उच्च श्रेणी सहायक शिक्षकांची तीन व निम्न श्रेणी सहायक शिक्षकांची पाच असे एकूण आठ शिक्षकांची पदे आवश्यक आहेत. मात्र या शाळेत वर्ग ५ ते १0 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या १७५ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहे.परिणामी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासंदर्भात पालकात चिंता व्यक्त केली जात आहे. हे सार्वजनिक शिक्षण क्षेत्रातील खरे वास्तव समोर आले आहे.

.       विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये शैक्षणिक सत्र २0२४ -२५ मध्ये वर्ग ५ – 3२, वर्ग ६ – ६७ ,वर्ग ७ – १९ , वर्ग ८ – २७ , वर्ग ९ – १९ आणि वर्ग १0 मध्ये ११ विद्यार्थी असे एकूण १७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र १७५ विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. शालेय शिक्षण विभागाने व जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांची रिक्त पदे भरली नाही. याचा विपरीत परिणाम शालेय विद्यार्थ्यांना भोगावा लागत असल्याचे दिसून येत आहे. याला कारणीभूत जिल्हा परिषद शिक्षण विभागाची कार्यशैली आहे.

.       विसापूर येथील शाळा व्यवस्थापन समिती ने व शाळेचे मुख्याध्यापक दिनेश वरघणे यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाला १८ जून २0२४ रोजी पत्र द्वारे तासिका तत्वावर शिक्षकांची नियुक्ती करावी,म्हणून मागणी केली. मात्र सन २0२४ – २५ हे शैक्षणिक सत्र सुरु होऊन देखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षक भरती केली नाही. शिक्षण विभागाच्या वेळकाडू धोरणामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांत व पालकांत पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्या संदर्भात चिंता निर्माण झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी शाळा बंद करण्याचा घेतला होता निर्णय                                                                                                                 जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल हायस्कूल शाळेतील पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून शाळा बंद होण्यापासून वाचविली होती. शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला यश आले. आता येथील शाळेची पटसंख्या वर्ग ५ ते १0 पर्यंत वर्गांसाठी १७५ विद्यार्थी झाली आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी केवळ दोनच शिक्षक आहे. परिणामी पुन्हा एकदा शिक्षक द्या,म्हणून आंदोलन करण्याची वेळ जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पालकांवर आणली. यात काही प्रमाणात यश आले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन्स व शिक्षणाधिकारी ( प्राथ ) अश्विनी सोनावणे यांनी सोमवार पासून विसापूर शाळेला शिक्षकांची नियुक्ती करणार असल्याचे शिष्ट्यमंडळाला ठोस आश्वासन दिले आहे.