प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती बनल्या शोभेच्या वास्तू

22

 

  • इमारतीवर लाखो रुपयांचा खर्च, मात्र कर्मचारीच नाही.

महेंद्र कोवले

*सिंदेवाही :-  प्राथमिक आरोग्य केंद्र वासेरा येथे आरोग्य केंद्राची टोलेजंग इमारत बांधून आरोग्य विभागाने लाखो रुपये खर्च केले. मात्र या भव्य दिव्य इमारती मध्ये कर्मचारी नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत शोभेची वस्तू बनली असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त करून लोकप्रतिनिधी विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

सिंदेवाही तालुक्यात वासेरा , मोहाडी, नवरगाव, गुंजेवाही, असे एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. यापैकी वासेरा आरोग्य केंद्राची इमारत टोलेजंग बनविण्यात आली असून कर्मचारी यांना स्थायी ठिकाणी राहण्यासाठी सर्व सोयियुक्त निवासस्थाने बनविण्यात आली आहेत. मात्र या आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी तथा आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी वितरक, परिचर,नसल्याने निवासस्थाने ओस पडलेली आहेत. नुकताच पावसाळा सुरू झाला असून पावसाळ्यात अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की, आरोग्य यंत्रणा सतर्क करणे आवश्यक असते. मात्र या आरोग्य केंद्रात रिक्त पदाचे ग्रहण लागले असून सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलेला दिसत आहे. या रिक्त पदांची आरोग्य विभागाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने रुग्ण सेवेवर याचा विपरीत परिणाम झालेला आहे. वासेरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती दुरुस्तीकरण आणि सुशोभीकरण करण्यासाठी शासनाने नुकताच लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. मात्र या इमारतीमध्ये राहण्यासाठी आणि या आरोग्य केंद्राला जोडलेल्या २२ गावातील नागरिकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी यांची पदे भरणे आवश्यक आहे. मात्र शासनाला नागरिकांच्या रुग्णसेवेचे काहीही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. वासेरा आरोग्य केंद्रात त्वरित दोन वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी वितरक परिचर, इत्यादी रिक्त असलेली पदे भरण्यात यावी. अशी मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे…