विविध समस्या घेऊन नगर परिषदेवर नागरिकांचा हल्ला-बोल.

113
  • प्रभाग क्रमांक २ मध्ये समस्याचा डोंगर 
  • पावसाला सुरु होऊनही नियोजन शून्य 

नागभीड : नागभीड नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या पंचायत समिती परिसर(प्रभाग क्र. २ ) येथे पायाभूत सुविधांचा अभाव, सगळीकडे घाणीचे साम्राज्य इत्यादी प्रश्नांना घेऊन पंचायत समिती परिसर नागभीड येथील नागरिकांचा नगर परिषदेवर हल्ला-बोल करण्यात आला.

नागभीड शहराची सर्वात पहिली आणि जुनी कॉलोनी म्हणून पंचायत समिती परिसराची ओळख आहे. नागभीड नगर परिषद अस्तित्वात आल्यापासून जवळपास आठ वर्षाच्या कालखंडात सदर परिसरात नगर परिषदेच्या माध्यमातून नाली, पक्के रोड पिण्याचे पाणी इत्यादी पायाभूत सुविधा सुध्दा निर्माण करण्यात आलेल्या नाहीत. उलट जे चांगले रस्ते आहेत तेही तपाळ पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली खोदून ठेवलेले असल्यामुळे खोदलेल्या भागातील माती पूर्णपणे रस्त्यावर आलेली आहे आणि त्यामुळे पावसाळ्यात सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. परिसरातील नागरिकांना सदर रस्याने जाणे येणे करणे जिकरीचे होऊन गेले आहे. रोज कुणी ना कुणी सदर रस्त्यावरून घसरून पडून गंभीर दुखापतग्रस्त होत आहेत.

त्याचप्रमाणे या परिसरात नाल्यांचे बांधकाम नसल्यामुळे सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे नागरिकांच्या घरासमोर सांडपाण्याचे डबके तयार झाले असून तेच पाणी परत घरात शिरत आहे. तसेच परिसरात बरेच मोकळे भूखंड असून पावसाळ्यात त्याला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त होत असते. त्याचप्रमाणे परिसरात झुडपांचे बन तयार होऊन डुकरांचे वसतिस्थान होत आहे आणि गंभीर बाब म्हणजे गावठी डुकरांच्या कळपात काही रानटी डुकरांनीसुध्दा जागा तयार केली आहे. मागील वर्षी याच रानटी डुकरांनी परिसरातील एका महिलेवर जीवघेणा हल्ला केला होता. परिसरातील नागरिक वेळीच धावून आल्यामुळे ती महिला बालंबाल बचावली होती तरीसुद्धा गंभीर दुखापत होऊन हाताचे फ्रॅक्चर झाले होते.

या परिसरात मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गातील नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु अजून पर्यंत एकाही स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या परिसराकडे लक्ष दिलेले नाही. फक्त निवडणूक आली की मतांचा जोगवा मागण्याकरिता स्थानिक स्वयंभू नेतेमंडळी येतात आणि पोकळ आश्वासने देऊन जातात बाकी नंतर जैसे थे.

आता नगर परिषदेत प्रशासन राज आहे त्या अनुषंगाने परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी आपली कैफियत घेऊन नगर परिषदेवर हल्ला बोल केला आणि आपल्या पायाभूत सुविधांच्या मागण्याचे निवेदन प्रशासक तथा मुख्याधिकारी मान. राहुल कंकाळ साहेब यांना दिले. त्याच प्रमाणे येत्या आठ दिवसात जर समस्यांचे निराकरण करण्यात आले नाही तर आंदोलनाचा इशारा देऊन त्याला जबाबदार नगर परिषद प्रशासन राहील असा इशारा देण्यात आला.