योगामुळे भावनिक, मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ – अपर जिल्हाधिकारी देशपांडे

17

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम

चंद्रपूर : योग ही प्राचीन भारताने जगाला दिलेली अमुल्य भेट आहे. आज संपूर्ण जगात योग दिन साजरा करण्यात येतो. नियमित योगामुळे आपले भावनिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

.       आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने बल्लारपूर (विसापूर) येथील क्रीडा संकूलात जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र व पंतजली योग समिती यांच्या वतीने मुख्य शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

.       यावेळी अध्यक्ष म्हणून अपर जिल्हाधिकारी देशपांडे बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (माध्य.) निकिता ठाकरे, अश्विनी सोनवणे (प्राथ.),  जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक समशेर सुभेदार, डॉ. मंगेश गुलवाडे, स्नेहा भाटिया, पतंजली योग समितीचे जिल्हा संघटक शरद व्यास व इतर मान्यवर उपस्थित होत.

.       यावेळी देशपांडे म्हणाले, योगासनाबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाल्याचे निदर्शनास येते, ही अतिशय चांगली बाब आहे. आज येथे उपस्थित नागरिकांनी योगासने आणि प्राणायाम केले. योगाचे महत्व सर्वांना समजावे, म्हणून लोकांच्या माध्यमातून हा संदेश योग दिनानिमित्त देण्यात आल्याचेही अपर जिल्हाधिकारी देशपांडे यांनी सांगितले.

.       कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये अविनाश पुंड म्हणाले, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय, नेहरु युवा क्रेंद्र व पंतजली योग समिती, यांच्या संयुक्त विद्यमाने 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात खेळाडू, शालेय विद्यार्थी, नागरीक, क्रीडाप्रेमी, शासकीय कार्यालयातील  अधिकारी/कर्मचारी यांचा मोठया प्रमाणात सहभाग होता.

.       यावेळी पतंजली योग समितीद्वारे योगाचे प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. यात सुखासन, विद्यासन, पद्मासन, दंडासन, ग्रीवाचारण (मानेचा विशिष्ठ व्यायाम), स्कंदचक्र, कटीचक्र, ताडासन, वृक्षासन, अधिचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, अर्धउष्ठासन, सशाकासन, उत्तानमंडूकासन, मक्रासन, वक्रासन, भुजंगासन, स्कंधरासन, उत्तानपादासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, शवासन, ध्यानमुद्रा, कपालभारती, अनुलोमविलोम, आम्रीप्राणायाम, मनोध्यान आदींचा समावेश होता. सदर कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त 10 खेळाडूंचा तसेच विविध खेळामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

.       कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी (मूल) विनोद ठिकरे यांनी मानले. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी जयश्री देवकर, क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके, विजय डोबाळे, संजना भरडकर, शुभांगी डोंगरवार, योग शिक्षिका, जिल्हा व तालुका क्रीडा संकुलातील अधिकारी – कर्मचारी, पतंजली योग समितीचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.